राजापूर:- कशेळी बांध येथे पोलीस व्हॅन पलटी होऊन अपघात झाला. सोमवारी सकाळी ९ वाजता हा अपघात घडला. या अपघातात पोलीस व्हॅन मधील सतरा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या सर्व जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण आजपासून करण्यात येत आहे. काही स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी विविध भागातून पोलिस बंदोबस्तासाठी मागवण्यात आले आहेत. राजापूर येथे बंदोबस्तासाठी सिंधुदुर्ग येथून आलेली पोलिसांची गाडी आज सकाळी बारसूकडे निघाली होती. आडिवरेनजीक कशेळीकोंड येथे उताराचा अंदाज न आल्याने हे वाहन रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघात झाला आहे. या अपघातात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. अपघातानंतर ग्रामस्थांनी धाव घेत मदत केली. जखमींना उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अपघात स्थळी भेट देत अपघाताची पाहणी केली. जखमी पोलिसांमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्गमधून आलेल्या पोलिसांचा समावेश आहे.









