कशेडी घाट भुयारी मार्गावर पुन्हा दरड कोसळली

संगलट:- सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत भुयारी मार्गापासून 200 मीटर अंतरावर दरड कोसळण्याची घटना तीन महिन्यांत तिसऱ्यांदा घडली आहे. याखेरीज, दोन्ही भुयारांमध्ये वीजेचा लपंडाव सुरू असल्याने अचानक काळोख अथवा प्रखर प्रकाश झाल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.

गेल्या मे व जून महिन्यात सुद्धा याच ठिकाणी दरड कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मंगळवारी पुन्हा कशेडी भुयारी मार्गाजवळ दरड कोसळल्याने मुंबई दिशेने जाणारी वाहतूक एकाच लेनवरून सुरू करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या महामार्ग प्रशासन व शिंदे डेव्हलपर्स कंपनीकडून दरड हटविण्यासाठी यंत्रणा पाठवून दरड हटविण्याचे काम सुरू केले आहे. या दरडी कोसळल्याची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत सुरू ठेवली आहे.

दरम्यान, कशेडी घाटात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भुयारी मार्गाजवळ वारंवार होणाऱ्या घटना लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आणि शिंदे डेव्हलपर्स कंपनी यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये रात्री अपरात्री कशेडी भुयाराच्या दोन्ही बाजूने टीम सज्ज ठेवणे गरजेचे बनले आहे. अवकाळी पाऊस सुरू झाल्यापासून दोन्ही भुयारी मार्गातील विद्युतप्रकाश व्यवस्था सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आदेश दिले. मात्र, पावसाळ्यात वेळोवेळी खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे भुयारात प्रखर प्रकाशझोत आणि मिट्ट काळोखाचा सुरू होणारा खेळ वाहनचालकांसाठी अपघाताला निमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता आहे.