रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी- वरवडे (वरचे) पाळवाडी येथे मंगळवारी (ता. २) रात्री भरवस्तीत बिबट्याने गाय फस्त केली. या बिबट्याने त्या गाईला भर वस्तीतच मारून टाकले. बिबट्याच्या या जीवघेण्या हल्ल्याने वरवडे कळझोंडी परिसरात दिवाळी सणाच्या कालावधीत भयंकर घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या बिबट्याला त्वरित जेरबंद करावे,अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ही गाय कळझोंडी बौद्धवाडी येथील गरीब शेतकरी बाळकृष्ण सखाराम जाधव यांची असून त्यांचे झालेले नुकसान त्वरित भरून मिळावे यासाठी वरवडे गावचे पोलिस पाटील बापू जोशी प्रयत्नशील आहेत. ही घटना वरवडे वरचे येथील शेती उद्योजक राजूशेठ विचारे व चंद्रकांत विचारे यांच्या घरानजीक घडली. विचारे यांनी गाईचे मालक बाळकृष्ण जाधव यांना त्वरित या घडलेल्या घटनेची माहिती दिली. संबंधित गावातील पोलिस पाटील, सरपंच पारकर, संतोष विचारे, संदीप पवार आदी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर खंडाळा पोलिस स्टेशनचे मनवळ व त्यांचे सहकारी यांनीही तातडीने घटनास्थळी भेट देऊन घटनेची वस्तुस्थिती पाहिली. या प्रसंगी वनविभागाचे अधिकारी वेळेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे वनविभागाच्या अनुपस्थित पोलिस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या गाईचे दफन करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन वस्तूस्थिती जाणून घेतली. त्यानंतर वनाधिकारी यांनी अपघातग्रस्त भागात कॅमेरे लावून ते निघून गेले.
या परिसरात अजूनही दोन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. बिबट्यांचे रात्री मोठ्याने ओरडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वस्तीच्या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. संपूर्ण वातावरणात घबराट निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. या बिबट्यांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी कळझोंडी-वरवडे भागातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.









