कळंबणीजवळ रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

खेड:- कोकण रेल्वे मार्गावर खेड तालुक्यातील नातु तर्फे वावे येथे एका रेल्वे अपघातात अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. २६ ऑक्टोबर रात्रीच्या सुमारास घडली. रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार २६/१०/२०२५ रोजी रात्री सुमारे २०.३० वाजण्याच्या सुमारास मौजे नातु तर्फे वावे (ता. खेड, जि. रत्नागिरी) या ठिकाणी एक अनोळखी पुरुष कोणत्यातरी रेल्वेतून खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, खेड येथे आणण्यात आला आणि याची नोंद दि. २७ ऑक्टोबर रोजी ०२.२६ वाजता झाली. सध्या, मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही, त्याचे नाव-गाव अज्ञात आहे. मयताचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू क्रमांक १०८/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे ‘बेवारस’ म्हणून करण्यात आली आहे.
रेल्वेतून पडून झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खेड पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अधिक तपास करत आहेत.