कर्जाला कंटाळून खेडमधील प्रौढाची आत्महत्या

जुन्या घरात ओढणीने घेतला गळफास

खेड:- कर्ज फेडता येत नसल्याच्या तीव्र नैराश्यातून खेड तालुक्यातील बोरघर, ब्राह्मणवाडी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुधीर लक्ष्मण पार्टे (वय ४५, रा. बोरघर, ब्राह्मणवाडी, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर पार्टे यांनी सुमारे वर्षभरापूर्वी कर्ज म्हणून सुमारे अडीच लाख रुपये घेतले होते. हे कर्ज फेडणे त्यांना शक्य होत नसल्यामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून कमालीच्या नैराश्यात होते.

याच नैराश्यातून सुधीर पार्टे यांनी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यानंतर आणि सायंकाळी ५ वाजेच्या आत आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी त्यांच्या राहत्या जुन्या घरातील हॉलच्या माळ्याला (लाकडी भाला) ओढणीने बांधले आणि त्याच ओढणीचा फास गळ्याला अडकवून गळफास घेतला.
ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खेड पोलिसांनी रात्री उशिरा ११:०० वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.

खेड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद १४ नोव्हेंबर रोजी रात्री १०:५८ वाजता करण्यात आली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यू क्रमांक (आमृ. क्र.) १११/२०२५ अन्वये भारतीय न्याय सुरक्षा संहिता १९४ प्रमाणे नोंद घेतली असून, आत्महत्येमागील नेमके कारण आणि आर्थिक विवंचनेची सत्यता तपासण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.