रत्नागिरी:- निवळी-जयगड मार्गावरील करबुडे येथे कार आणि डंपरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून चालक जखमी झाला आहे. हा अपघात आज (दि. २४) दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. अनिरुद्ध चव्हाण (रा. नाचणे) या अपघातात जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चव्हाण कारमधून निवळीहून जयगडच्या दिशेने जात होते. तेव्हा जयगडहून निवळीच्या दिशेने जाणारा डंपर आणि त्यांच्या कारची धडक झाली. चव्हाण यांची मोटार रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चव्हाण यांना उपचारासाठी हलविण्यात आले. उशिरापर्यंत या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती.