देवरुख पोलिसात बोलेरो चालकावर गुन्हा दाखल
देवरुख:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील करंजारी येथे बोलेरो पिकअपने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. या प्रकरणी बोलेरो चालकावर मंगळवारी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राम आशिष मोरिया (२७, रा. करंजारी बाजारपेठ) असे मृत तरूणाचे नाव आहे.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मजीममुल्ला अश्रफ अली खान (५५, रा. करंजारी बाजारपेठ) यांनी फिर्याद दिली. २८ रोजी मजीममुल्ला खान यांचा मुलगा मोईनअखतर खान (२७) हा फॅशन प्रो (एमएच ०८, एझेड- ४१५७) गाडीच्या मागील सीटवर राम मोरिया याला बसवून कोल्हापूर ते रत्नागिरीच्या मार्गाने घरी येत होता. याचवेळी बोलेरो मच्छी भरून कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने येत होती.
करंजारी बाजारपेठ येथे बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोईनअखतर खान याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. हा अपघात २८ रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास घडला. अपघातात मोईनअखतर खान याच्या हाताला व पायाला तर राम मोरिया याच्या डोक्याला व हाता-पायाला दुखापत झाली. राम मोरिया याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर बोलेरो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघातास व राम मोरिया याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात बोलेरो चालकावर देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६, २८१, १२५ (अ), १२५ (ब), मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.