कपड्यांच्या बॅगांना पैशांची बॅग संबोधणे ही राजकीय अपरिपक्वता: ना. सामंत

रत्नागिरी:- नगर परिषद निवडणूक प्रचारासाठी आलेले शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशांच्या बॅगा सोबत आणल्या होत्या असा उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक यांचे आरोप म्हणजे राजकीय अपरिपक्वता आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उप नेते व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधील कपड्याच्या बॅगांमध्ये पैसे असल्याचा केलेला आरोप उदय सामंत यांनी पूर्णपणे फेटाळला. सामंत म्हणाले, “वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि फार मोठा एक शोध लावला. पण, ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा केला आहे, त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. ते 53 सभा करणारे एकमेव नेते आहेत. हा प्रवास करत असताना काही ठिकाणी मुक्काम करावा लागतो आणि त्यासाठी त्यांना कपड्यांची बॅग सोबत ठेवणे अगदी स्वाभाविक आहे.

सामंत यांनी नाईक यांच्या उद्देशावरही टीका केली. ते म्हणाले, एखाद्या मोठ्या नेत्यावर आरोप केल्यानंतर आपण मोठे होतो, कदाचित वैभव नाईकांची ही भूमिका असावी आणि त्यांच्या नेत्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांनी हे केले असावे. मालवण नगरपालिकेमध्ये वैभव नाईकांचे पॅनल हे तीन नंबरला जाणार आहे. या नैराश्यातून केलेला हा आरोप आहे. शिंदे साहेबांना पैसे वाटण्याची आवश्यकता नाही, कारण कार्यकर्ते हीच त्यांची ताकद आहे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

सामंत यांनी वैभव नाईक यांना एक मित्र म्हणून विनंती केली. राजकारण होतच असतं, पण विरोधात असताना देखील जी लोक आपल्याला मदत करतात, त्याची कुठेतरी जाणीव आपल्या हृदयाच्या कुठल्यातरी छोट्याशा कोपऱ्यामध्ये असली पाहिजे, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे साहेबांनी नाईक त्यांच्यासोबत आले नसतानाही कधीही राग मनात न ठेवता विकासाच्या कामातून त्यांना मदत केली आहे. त्यामुळे, नाईकांनी फक्त आपल्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी शिंदे साहेबांवर टीका करणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. या जिल्ह्यात निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समक्ष रोकड पकडल्याच्या घटनेवर बोलताना सामंत यांनी पोलिसांना आवाहन केले. ते म्हणाले, “आम्ही युतीने महाराष्ट्रामध्ये काम करतोय, केंद्रामध्ये देखील आपलं सरकार आहे; परंतु एखादी चूक गोष्ट जर घडली असेल तर त्याला पोलिसांनी पाठीशी घालू नये. महाराष्ट्रातलं पोलीस हे स्वाभिमानी पोलीस आहे याची नोंद पोलिसांनी घ्यावी.

निवडणुका पुढे ढकलून २० तारखेला करणे आणि मतमोजणीचा निकाल २१ तारखेला करण्याचा कोर्टाने निर्णय दिल्यावर सामंत यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, “असा निवडणुकीचा प्रसंग पहिल्यांदा झालेला आहे. इतक्या वर्षांच्या निवडणुकीच्या अनुभवात (२५ वर्षे) हे कधीच घडले नव्हते.” निवडणूक आयोगाला यातून काय साध्य करायचं आहे, यावर शंका निर्माण होत असून, याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे, असे त्यांनी सांगितले.

महायुतीतील नेत्यांच्या परिपक्वतेबद्दल बोलताना सामंत यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी आणि ईश्वरपूरला युतीच्या उमेदवारांसाठी प्रचार केल्याचे उदाहरण दिले. नेत्यांमध्ये समन्वय असला तरी, कार्यकर्त्यांनी युतीधर्म पाळला पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. “नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या जी फळी आहे, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की उद्या नंतर पुन्हा आपल्याला महायुती टिकवायचे आहे. आम्ही अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर बदनामीकारक काही वक्तव्य केले नाही, तसेच इतर कार्यकर्त्यांनीही वागावे,” असे आदेश नेत्यांनी दिले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.