कंपन्यांनी कोविड सेंटर उभारावे अन्यथा कंपन्या बंद

जिल्हाधिकारी यांचा सज्जड इशारा

रत्नागिरी:- उद्योगासाठी लागणारा ऑक्सिजन बंद करून तो आरोग्यासाठी देण्याचे आदेश उद्योजकांना दिले आहेत. कंपनीमध्ये किमान 50 बेडचे कोविड सेंटर सुरू करा, असा सूचना दिल्या आहेत. काही मोठ्या कंपन्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र ती व्यवस्था न केल्यास कंपनी बंद करू, असा इशारा कंपन्यांना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.

ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व उद्योजकांसोबत गुरुवारी (ता. 22) व्ही.सी. घेतली. त्यामध्ये सर्व उद्योजकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक सूचना दिल्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने बाधित कर्मचारी मिळाल्याची माहिती आली होती. त्यावर कंपन्यांना आपल्या स्तरावर तत्काळ उपाययोजना करण्यास सांगितले आहेत. प्रत्येक कंपनीने 50 बेडचे कोविड सेंटर सुरू करायचे आहे. तसेच कर्मचार्‍यांच्या चाचण्या करण्यास सांगितले आहे. घरडा, लोटेतील काही कंपन्या, फिनोलेक्सने कोविड सेंटर सुरू केले आहे. जेएसडब्ल्यू कंपनीने 50 खाटांचे कोविड सेंटर उभे करण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी 10 टक्के ऑक्सिजन बेड असणार आहेत. त्याची नोंद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असणार आहे. बेड रिकामे असतील तर तेथील स्थानिकांनाही त्याचा फायदा होणार आहे.ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्याची कारवाई सुरू झाली आहे. दहा ड्युरा सिलिंडर ताब्यात घेणार आहोत. घरडा कंपनीत 70, दापोली कृषीभवन येथे 25 बेडची व्यवस्था होत आहे. रत्नागिरी सिव्हिलमध्येही 50 ऑक्सिजन बेड उभारण्याचे काम सुरू आहे. 170 जम्बो सिलिंडर भरण्याचा प्लॅन्ट महिला रुग्णालयात सुरू केला जाणार आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.