कंत्राटी शिक्षकभरती रद्द निर्णयाचा पुनर्विचार करा

रत्नागिरीतील बैठकीत स्थानिक उमेदवारांची मागणी

रत्नागिरी:- शासनाने कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील 700 स्थानिक उमेदवारांना बसला आहे. त्यांना आता घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. या निर्णयाविरोधात उमेदवार आक्रमक झाले असून रविवारी सर्व उमेदवारांनी एकत्र येत निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करून निर्णय अबाधित ठेवावा, अशी मागणीही केली आहे.

राज्य शासनाने 23 सप्टेंबर 2024 रोजी 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत एक कंत्राटी शिक्षक देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यात 700 स्थानिक बी. एड., डी.एड बेरोजगारांना रोजगार मिळाला. त्यांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना 15 हजार रुपये मानधन देण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात 700 शाळांना याचा फायदा झाला. यामुळे शैक्षणिक समतोल राखण्यास यश मिळाले. तसेच गुणवत्ता वाढीसाठी याचा फायदा झाला. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हा रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. शेवटी 10 फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा घेतला गेला. तसा जीआर शासनाकडून काढण्यात आला.

या निर्णयाचा सर्वात फटका हा रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. 700 शाळांमध्ये आता गैरसोय होणार आहे. मुळात रत्नागिरी जिल्हा भरतीचे केंद्र बनले आहे. आंतरजिल्हा बदलीने शेकडो शिक्षक परजिल्ह्यात जात आहेत. यामुळे रिक्तपदांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जिल्ह्यात दीड हजारपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात आता हा कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

शासनाने हा कंत्राटी शिक्षक भरतीचा जीआर रद्द करून नवा जीआर काढला आहे. शिक्षक पवित्र पोर्टलवरून भरती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अजून मात्र त्याची तारीख निश्चित करण्यात आली नाही. असे असताना या कंत्राटी शिक्षकांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पवित्र पोर्टल हे जिल्ह्यासाठी अपवित्र ठरत आहे. कारण पवित्र पोर्टलवरून परजिल्ह्यातून येणार्‍या शिक्षकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते आणि हे शिक्षक पुन्हा आंतरजिल्हा बदलीने आपल्या जिल्ह्यात जातात. यामुळे पवित्र पोर्टलवरून भरती घेताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, शासनाच्या या निर्णयाविरोधात रविवारी या कंत्राटी भरतीतील उमेदवारांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा एकमुखी निर्णय झाला. ही बैठक कुवारबाव येथे पार पडली. या बैठकीत शासनाने या निर्णयाचा पुर्नविचार करावा आणि कंत्राटी शिक्षक भरती सुरु ठेवावी, अशी मागणीचे निवेदन स्थानिक आमदार व शासनाकडे देण्यात येणार आहे.

सुदर्शन मोहिते, अध्यक्ष- डी.एड., बी.एड. रोजगार संघटना, रत्नागिरीशासनाने कंत्राटी शिक्षकांबाबत जो निर्णय घेतला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. या निर्णयाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत. पवित्र पोर्टल हे कोकणासाठी कायम अपवित्र झाले आहे.