लांजा: रस्त्यावर बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील सापुचेतळे येथे घडली.
लांजा तालुक्यातील उपळे मोडकवाडी येथील रमेश शंकर धुमक (३८ वर्षे) हा आपली दुचाकी क्र. (एम. एच. ०८ एटी. ४२३२) घेऊन सोमवारी सकाळी ९ वा. रत्नागिरी येथे काही कामानिमित्त गेला होता. रत्नागिरी येथे काम आटोपून तो सायंकाळी आपल्या घरी पावसमार्गे येत असता रात्री ८.३० वा. च्या सुमारास सापुचेतळे येथे रस्त्याच्या बाजूला चिरा भरलेला कंटेनर क्र.(के.ए. २८ डी. ४३११) हा बंद पडला होता. हा कंटेनर दुचाकीस्वार रमेश धुमक याला दिसुन न आल्याने त्याची दुचाकी मागून कंटेनरवर जोरदार आदळल्याने हा अपघात झाला. अपघातात रमेश धुमक जागीच ठार झाला. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.