औद्योगिक वसाहतींमुळे कोकणातील 52 खाड्या प्रदूषित

रत्नागिरी:- नद्यांच्या सागरमुखाशी किंवा खाड्यांवर औद्योगिक वसाहती उभ्या केल्याने कोकणातील 52 खाड्या प्रदूषित असल्याचा अहवाल एका पर्यावरण संस्थेने अलीकडेच प्रसिद्ध केला. त्यामुळे खाड्यांच्या परिघात उभारलेल्या उद्योगांमुळे उद्भवलेल्या पर्यावरण परिणामांची छाननी करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आल्या आहेत. नागरीकरणामध्ये सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाचे ढिसाळ नियोजन, अतिक्रमणांमुळे पात्र अरुंद करण्याच्या प्रकारांमुळे कोकणातील नद्यांचा जीव घोटला गेला आहे. गेल्या दशकभरात औद्योगिक, रासायनिक टाकाऊ पदाथपिक्षाही घरगुती सांडपाणी, मलनिःसारणामुळे नद्या, खाड्या, पाणथळ जागांचे पर्यावरण प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे निरीक्षण पर्यावरण अभ्यासकांनी नोंदविले आहे.

अलिकडेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोकणातील खाड्यांच्या पर्यावरणाचा अभ्यास केला होता. यात खाड्यातील अनेक प्रकारच्या माशांच्या प्रजाती प्रदूषित पाण्यामुळे नष्ट झाल्याचा मुद्दा नोंदविण्यात आला आहे. अनेक प्रकारच्या कचऱ्यांनी खाड्या प्रदुषणाने वेढल्या गेल्या आहेत. यामुळे टाकाऊ पदार्थांचे विघटन होत नसल्याची नोंद या अभ्यासात घेण्यात आली होती. नद्या किंवा खाड्यांवर एमआयडीसी वसवण्यात आल्याने या खाड्यांची दुरवस्था झाली आहे. केरळसारख्या राज्यात ‘बॅक वॉटर’मुळे पर्यटन व्यवसाय तेजीत आहे. अनेक प्रकारच्या पर्यटन सुविधा खाडीकिनारी उपलब्ध केल्याने येथे खाड्या या पर्यटनाची केंद्रे झाली आहेत. कोकणात मात्र ही नैसर्गिक संपदा दुर्लक्षितच राहिली आहे.

ठाणे पालघर या कोकणातील जिल्ह्यात खाड्यांच्या परिघातील पाणथळ जागा अतिक्रमणाने वेढल्या आहेत. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील खाडीकिनारी असलेल्या कांदळवनाची जंगले अतिक्रमाणाने नष्ट होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक खाड्या समुद्रकिनाऱ्याला जोडल्या गेल्या आहेत. त्यामध्ये बाणकोट, दाभोळ, जयगड, साखरतर, पूर्णगड, भाट्ये, वाशिष्ठीसह अनेक छोट्या-मोठ्या खाड्यांचाही समावेश आहे. विविध जातींच्या भरगच्च हिरव्यागार कांदळवनांमध्ये जैवसृष्टी लपली आहे. ती पर्यटकांसाठी आकर्षणाची ठरत आहेत. बाणकोट खाडीतील मगरींचा अधिवास हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मार्श क्रोकोडाईल प्रजातीच्या मगरी खाडीच्या बॅकवॉटरमध्ये सापडत असल्याची नोंद आहे. या परिसरातील कांदळवनाचे दाट जंगल असून रायझोफोर ‘मुक्यॉनाटा’ म्हणजेच लाल कांदळांची प्रजात आढळते. या कांदळवनाच्या झाडाला दुरून पाहिल्यानंतर ते चालत असल्याचा आभास निर्माण होतो म्हणून त्याला वॉकिंग मॅग्रोव्ह म्हटले जाते. ब्लॅक कॅप किंगफिशर हा दुर्मिळ पक्षी सापडतो. दाभोळ खाडी 70 किलोमीटर लांब असून तिचा वाशिष्ठी नदीशी संगम होतो. या खाडीकिनारी कांदळवनाच्या विविध प्रजाती आहेत. यात प्रामुख्याने काळा समुद्री बगळा, ढोर बगळा, राखी बगळा, खरबा बगळा, मध्यम बगळा, कवड्या खंड्या असे पक्षी सापडतात. रत्नागिरीपासून अंदाजे 70 कि.मी. अंतरावरील अणसुरे खाडी या प्रत्येक खाडीकिनारी कांदळवने आहेत. त्या-त्या भागांचे वैशिष्ट्य असलेले काही घटकही आहेत. खाड्यांना प्रदुषणाने वेढल्याने या खाड्याचा पर्यावरणीय अहवाल देण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आल्या आहे.
रत्नागिरीजवळील समुद्राला मिळणारी भाट्याची खाडी या भागामध्येही कांदळवनांची समृद्ध बेटे आहेत. भाट्ये पुलापासून काही अंतरावर खाडीच्या मधोमध एक मोठे बेट आहे. तेथे विविध प्रकारचे पक्षी वास्तव्य करून आहेत. सायंकाळच्या वेळी पक्ष्यांचा सुरू असलेला किलबिलाट हा पर्यटकांसाठी पर्वणीच ठरतो. खाडीच्या किनाऱ्यावरील भागांना पर्यटनाची जोड देऊन एकात्मिक आराखडा करणे आवश्यक असल्याचे मत कर्ला येथील पर्यटक व्यावसायिक राजन भाटकर यांनी व्यक्त केले आहे.