ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटल्याने कोरे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; पाच तासांनी वाहतूक सुरळीत

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटली होती. यामुळे पहाटे 1 वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. पण अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलं. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली.

विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत होत असली तरी या वाहतूक विस्कळीतपणाचा त्रास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांना झाला. राज्य उद्योग मंत्री सामंत रत्नागिरी दौरा करणार होते, परंतु वाहतूक सुरळीत नसल्याने सामंत यांनी पुन्हा मुंबई गाठली. भापजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही वाहतूक विस्कळीतपणाचा फटका बसला. चंद्रशेखर बावनकुळे कोकण कन्या एक्स्प्रेसनं प्रवास करत आहेत. कोकण कन्या गाडी जवळपास साडेतीन तास उशिरानं धावत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असून आज ते रत्नागिरी जिल्ह्यात असणार आहेत.

दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. परिणामी अनेक गाड्या विविध स्टेशनवरती खोळंबलेल्या होत्या. बिघाड झालेली रेल्वे मार्गस्थ होऊनही कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या दोन ते साडेतीन तास उशिराने धावत आहेत. कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.