ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी-ट्रकचा अपघात; तरुण गंभीर जखमी

रत्नागिरी:- चारचाकी गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकवर आढळणाऱ्या दुचाकीचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. जखमी तरुणावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 
 

या अपघाताबाबत ट्रकचालक सुबोध शंकर सुर्वे (रा. पाली बाजारपेठ) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात खबर दिली. सुर्वे आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. MH-09-AK-1161) घेऊन पाली येथून गोळपच्या दिशेने निघाले होते. यावेळी अपघातात जखमी लक्ष्मण तानाजी सोनवडकर (रा. करबुडे) हे दुचाकी घेऊन रत्नागिरीतून निघाले होते. पानवल येथे साई एजन्सी समोर आले असताना चारचाकी गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक झाली. 
 

या धडकेत दुचाकीचालक लक्ष्मण सोनवडकर जबर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. डोकं फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रक्त सांडले. जखमी सोनवडकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघाताची ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.