रत्नागिरी:- कोरोनाच्या नव्या व्हायरसची भीती लक्षात घेऊन शासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शिवाय शाळा सुरू करताना घालून दिलेल्या निबंधांमुळे या वर्षीही विद्यार्थ्यांच्या गॅदरिंगला यंदाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. सहली आणि गॅदरिंगवर यंदा तिसर्यावर्षी निबर्ंंध आले आहेत. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धाही अजून झालेल्या नाहीत.
विविध निर्बंध घालून डिसेंबरपासून शाळांना प्रारंभ झाला. डिसेंबरपासूनच शाळांच्या सहली आणि गॅदरिंगची धूम सुरू असते. शैक्षणिक सहल आणि विविध कलागुणांना वाव देण्यासाठीची तयारीही सुरू असते. मात्र, तीन वर्षांपासून यात खंड पडला आहे. शालेय शिक्षण विभागाकडूनही सहली व गॅदरिंगबद्दल निश्चित असे संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे या वर्षीही या उपक्रमांना ब्रेक लागणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
डिसेंबर आणि जानेवारी महिना शैक्षणिक क्षेत्रात सहलींचा हंगाम मानला जातो. दोन वर्षापासून ऑनलाईन शिक्षण सुरू होते. शाळा, महाविद्यालयीन जीवनामध्ये शैक्षणिक जडणघडणीबरोबरच सामाजिक जडणघडणही तितकीच महत्त्वाची मानली जाते. त्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या स्तरावर विविध शैक्षणिक व अभ्यास सहलींचे आयोजन केले जाते. सहलीत मौजमजा व मस्तीबरोबर निसर्गरम्य ठिकाणी भेटी दिल्या जातात. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा अभ्यास केला जातो.
दुसर्या सत्रामध्ये शाळास्तरावर अशा सहलींचे नियोजन केले जाते. सहलीनंतर पुढील अभ्यासासाठी नवी ऊर्जा मिळावी म्हणून पर्यटनस्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना विद्यार्थ्यांच्या भेटी घडवून आणल्या जातात. मात्र सहली, गॅदरिंगला परवानगी नसल्याने विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे.
कोरोना निबंधामुळे शाळांमधील मैदाने ओस पडली आहेत तर सलग तीन वर्षे सहली नसल्याने पर्यटनस्थळे विद्यार्थ्यांअभावी ओस पडली आहेत. जिल्ह्यातील अनेक स्थळे शैक्षणिक सहलीवर अवलंबून आहेत. त्यांना याचा मोठा फटका बसला
आहे









