रत्नागिरी:- कोकणातील तिलोरी कुणबी आणि ओबीसी समाजाचा हैद्राबाद गॅजेटीअरसंदर्भात जो गैरसमज होता, त्याबाबत या समाजाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला यामुळे कसलाही धक्का लागणार नाही, असा विश्वास दिला. त्यांच्या शंकाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि जर त्यामध्ये सत्य असले तर मी स्वतः तुमच्या सोबत असेन अशा शब्द या समाजाला दिला, असे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
ओबीसी, कुणबी समाजाच्या शंकांचे शासनस्तरावर पूर्ण समाधान व्हावे, यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ओबीसी आणि तिलोरी कुणबी समाजाच्या प्रमुख नेत्याशी मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या हैद्राबाद गॅजेटीअरसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदे ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आदी उपस्थित होते.
उदय म्हणाले, ओबीसी आणि तिलोरी कुणबी समाजाच्या नेत्यांशी सुमारे दीड तास चर्च झाली. ९ तारखेला मराठा आरक्षणाविरूद्ध या समाजाचे मुंबईत आंदोलन आहे. या पार्श्वभुमीवर आज या समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. हैद्राबाद गॅजेटीअर हे त्या भागलपुरते मर्यादीत आहे. त्याचा कोकणाशी काही संबंध आहे. या गॅजेटीअरमुळे ओबीसी आणि तिलोरी कुणबी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही किंवा ते कमी होणार नाही. तसा शब्द मी तुम्हाला देतो. या अद्यादेशाबाबतची भूमिका मी त्यांच्या समोर मांडली. त्यांच्या शंकाही दूर करण्याचा प्रयत्न केला.
हैद्राबाद गॅजेटीअरसंदर्भात जिल्ह्यात एकही दाखला सापडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३६३ कुणबी-मराठा नोंदी सापडल्या आहेत. परंतु त्यापैकी आतापर्यंत फक्त १५ दाखले मिळाले आहेत. परंतु त्यांची पुर्ण जातपडताळणी झालेली नाही. लांजा, संगमेश्वर, देवरूख, आदी भागातमध्ये या नोंदी सापडल्या आहेत, असे सामंत म्हणाले.
पूरग्रस्तांना मदतीचे तोरण बांधून दसरा साजरा करणार
विदर्भ, मराठवाड्यामध्ये महापुरामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या लोकांना मदतीचा हात पुढे करावा, असे विविध कंपन्यांना आवाहन केले आहे. त्यानुसार कंपन्यांचा सीएसआर फंड देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. समाजातील सर्व थरातील लोकांनी मदत करावी. दसरा मेळावा हा शिवसेनेचे परंपरा आहे. परंतु महापूरामुळे शिवसेनेने आजाद मैदानावरील दसरा मेळावा रद्द केला आहे. परंपरेनुसार गोरेगावला तो होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आमच्या पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली असून पूरग्रस्त जिल्ह्यामध्ये जाऊन बाधीतांना मदत करून त्यांच्या घराला तोरण बांधुन दसरा साजरा करण्यासाठी आम्ही सर्व जाणार आहेत, असे उदय सामंत यान सांगितले.