राजापूर:- मुंबई गोवा महामार्गावर ओणी येथे वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डीपीच्या कामाची दुरुस्ती करत असताना ही दुर्घटना घडली.
पेट्रोलपंप समोरील महावितरणच्या डिपीवर दुरूस्तीचे काम करत असताना वायरमन प्रकाश बाबू गमरे (५२) रा. ओणी या विज कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यु झाला आहे. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. या घटनेने ओणी गावावर शोककळा पसरली आहे.
गमरे यांची रविवारी सुट्टी असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कामावर बोलवले होते. ते सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ओणी पेट्रोलपंपासमोरील म हावितरणच्या डीपीवर दुरूस्तीचे काम करत असताना त्यांना जोराचा शॉक लागून ते जागीच गतप्राण झाले. शॉक लागलेल्या अवस्थेत ते डीपीला लटकत होते. या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले असून घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
गमरे हे गेले १५ ते २० वर्षे महाविरणमध्ये वायरमन म्हणून काम करत होते. रविवारी त्यांची आठवडा सुट्टी होती. तरीही ते कामावर रूजू झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांना अचानक शॉक लागला व ते गतप्राण झाले.
मुंबई गोवा महामार्गावरच ही दुर्घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच ओणी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वायरमन गमरे यांच्या अशा अपघाती निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. तर त्यांची सुट्टी असतानाही कामावर बोलविणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.