ओंकार पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणात व्यवस्थापक दोषी

२.०३ कोटींची वसुलीचे आदेश; फेर चौकशी अहवालात संचालक मंडळाला दिलासा

देवरूख:- देवरूख येथील अग्रगण्य असलेल्या ‘ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.’ मधील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. प्राधिकृत चौकशी अधिकारी अविनाश इंगळे यांनी सादर केलेल्या अहवालात, संस्थेच्या २ कोटी ३ लाख २७ हजार ६७० रुपये इतक्या मोठ्या गैरव्यवहारासाठी तत्कालीन व्यवस्थापक वासंती अनिल निकम यांना जबाबदार ठरवत दोषी घोषित केले आहे. या फेर चौकशीमुळे पूर्वी दोषी ठरवलेल्या संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे.

​यापूर्वीच्या एका चौकशी अहवालात संस्थेच्या गैरव्यवहारास तात्कालीन संचालक मंडळाला दोषी ठरवून त्यांना ही रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, संचालक मंडळाने या निर्णयाला आव्हान देत फेर चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ नुसार अविनाश इंगळे यांची प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

​प्राधिकृत चौकशी अधिकारी इंगळे यांच्या अहवालाची छाननी केल्यानंतर, तत्कालीन सचिव तथा व्यवस्थापक वासंती अनिल निकम याच या गैरव्यवहारास जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

​सहायक निबंधक सहकारी संस्था, देवरूख यांनी वासंती निकम यांच्यावर जबाबदारी निश्चित करत, त्यांना गैरव्यवहाराची संपूर्ण रक्कम २ कोटी ३ लाख २७ हजार ६७० रुपये अधिक गैरव्यवहार झाल्याच्या तारखेपासून रक्कम भरणा करेपर्यंत १५ टक्के व्याज यासह संस्थेत त्वरित भरण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

​सहायक निबंधक साहेबराव पाटील यांनी वासंती निकम यांना नोटीस बजावली असून, उपरोक्त रक्कम भरणा न केल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९८ (ब) अन्वये वसूली प्रमाणपत्र का देण्यात येवू नये? याबाबत नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांत लेखी किंवा तोंडी खुलासा करण्यासाठी दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

​जर दिलेल्या दिवशी व वेळी खुलासा सादर न केल्यास, कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्या स्थावर मालमत्तेच्या जप्तीची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशी गंभीर नोंद नोटीसीद्वारे घेण्यात आली आहे.