रत्नागिरी:- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (आरटीई) अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील खासगी शाळांच्या नोंदणी प्रक्रियेची मुदत संपली असून, जिल्ह्यातील 94 शाळांमध्ये 914 जागा उपलब्ध आहेत.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी 25 टक्के जागा राखीव असतात. या जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षण विभागातर्फे जानेवारीमध्ये जाहीर करण्यात आले होते. शाळांची नोंदणी संथ गतीने सुरू असल्याने नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली होती. त्याची मुदत मंगळवारी संपली.
संभाव्य वेळापत्रकानुसार 8व9 मार्च 2022 रोजी सोडतही जाहीर होणार होती. त्यानंतर मार्च, एप्रिल व मे महिन्यात चार टप्प्यांत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, शाळांची नोंदणी प्रक्रियाच रखडल्याने प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेला विलंब होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशप्रक्रिया तब्बल एक महिना पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षीही कोरोनामुळे आरटीईची प्रवेश प्रक्रिया संथगतीने पूर्णत्वास गेली होती. जिल्ह्यात एकूण 94 शाळांमध्ये 914 जागा आहेत. यामध्ये पूर्व प्राथमिक वर्गासाठी 18 तर पहिलीसाठी 816 जागा रिक्त आहेत.
प्रवेश अर्ज करताना जास्तीत जास्त कोणत्याही शाळांची निवड करायची आहे. त्यामध्ये एका शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. ही निवड ऑनलाईन पद्धतीने लॉटरीद्वारे करण्यात येणार आहे. अर्ज करताना अचूक व खरी माहिती भरणे गरजेचे आहे. अर्ज भरला किंवा प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे म्हणजे प्रवेश निश्चित होईल असे नाही. प्रवेशपात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी मुदतीत प्रवेश न झाल्यास मुदतीनंतर शाळेच्या किंवा पालकांच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावा, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.