ऑनलाईन खरेदीचा झटका, बाजारपेठेला मोठा फटका

रत्नागिरी:- ग्राहकांच्या आॅनलाईन खरेदीमुळे मागील दोन वर्षांपासून बाजारपेठेची गणिते बदलु लागली आहेत. यंदाच्या दिवाळीतही स्थानिक विक्रेत्यांना आॅनलाईन खरेदीचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. यामध्ये मोबाईलच्या विक्रीत तब्बल ४० टक्के घट आणि संगणक विक्रीचा व्यवसायदेखील जवळपास ७० टक्क्यांनी कमी झाला आहे. कपडे आणि इलेक्ट्रानिक्स वस्तूंच्या विक्रीवरही आॅनलाईन विक्रीचे सावट राहीले.

मल्टिमिडीया मोबाईलवरून मनाला वाटेल तेव्हा आणि कधीही आॅनलाईन शॉपिंग सहज शक्य असल्याने ग्राहक वर्ग सध्या आॅनलाईन बाजाराकडे वळला आहे. अशातच ग्राहकांना खूष करण्यासाठी अधिकाधिक सोशल नेटवर्कींग साईट्स नवनवीन स्किम हातात घेत असल्याने स्थानिक बाजारपेठांचे गणित बदलले आहे. हातातील मोबाईलवरून मनाला वाटेल तेव्हा आॅर्डर देता येत असल्याने शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही आॅनलाईन शॉपिंगचा बाजार तेजीत आला आहे. पूर्वी शहरापुरतीच मर्यादित असलेली आॅनलाईन उत्पादने घरपोच केली जात होती. आता शहरासोबतच लगतच्या ग्रामीण भागातही आॅनलाईन खरेदी करून मागवण्यात येणारे मेमरी कार्डपासून वॉशिंग मशिन्सही घरपोच केल्या जात आहेत.
नामांकित कंपन्यांची उत्पादने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होत असल्याने आॅनलाईन खरेदीचा व्यवसाय तेजीत आला आहे. मात्र, त्याचे चटके स्थानिक व्यापाºयांना सहन करावे लागत आहेत. दरवर्षी दिवाळीला रत्नागिरीच्या बाजारपेठेत करोडोंची उलाढाल होते. परंतु, यावर्षी आॅनलाईन खरेदीमुळे ही उलाढाल थंडावल्याचे चित्र होते. सणांमध्ये आणि विशेष करून दिवाळीत होणारी मोठी खरेदी लक्षात घेऊन सर्वच आॅनलाईन कंपन्यांनी मोठी सुट दिल्याने रत्नागिरीतील स्थानिक बाजारावर मोठा परिणाम झाला.

अ‍ॅमोझॉन, स्नॅपडील, फ्लिपकार्ट यासारख्या मोबाईल अ‍ॅप्सवर अनेक आॅफर जाहीर झाल्याने ग्राहकांनी आॅनलाईन खरेदीकडे आपला मोर्चा वळवला. मोटरोला, मायक्रोमॅक्स सारख्या मोबाईल कंपन्यांनी आपली उत्पादने याच संकेतसळावर उपलब्ध करून दिली आहेत. मायक्रोमॅक्स, मायक्रोसॉफ्ट सारखी उत्पादने बाजारभावापेक्षा एक ते दिड हजार रूपयांनी स्वस्त असल्याने ग्राहक आॅनलाईन शॉपिंगकडेच वळल्याचे दिसून आले. यामुळे दिवाळीत बाजारपेठेतील मोबाईलची खरेदी ४० ते ५० टक्क्यांपर्यत घटल्याचे दिसून आले. मोबाईलसाठी आवश्यक अन्य वस्तूंसाठीही आॅनलाईन बाजारपेठेलाच प्राधान्य देण्यात आले आहे. संगणकांच्या बाबतीतही हीच परिस्थीती राहील्याने संगणक व्यवसायावरही आॅनलाईन शॉपिंगचा परिणाम झाल्याचे दिसून आले.