ऑक्सिजनसाठी रायगड, कोल्हापूरवर जिल्ह्याची मदार

जिल्हाधिकारी ; दोन जिल्ह्यातून 15 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा स्प्रेड सुरू झाला आहे. त्यात काठोकाठो ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज असून रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यांवर रत्नागिरीची मदार अवलंबून आहे. या दोन्ही जिल्ह्यातून १३ ते १५ मेट्रिक टन ऑक्सिनजचा पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच ऑक्सिजनचादेखील पुरवठा काठोकाठ होत असल्याने याबाबतचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा त्याबाबतची माहिती दिली. यावेळी संसर्ग सुरू झाला असल्याचे सांगून काळजी घेण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या जिल्ह्यात चार हजारच्या पुढे ऍक्टीव रूग्ण आहेत. सध्या ५०० चे ऍव्हरेज सुरू आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. या रूग्णांमधील १० टक्के रूग्णांना ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीदेखील वाढू लागली आहे. राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. खासगी रूग्णालयातदेखील ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. रत्नागिरीत काठोकाठ ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. सध्या कोल्हापूर व रायगड या दोन जिल्ह्यांमधून १३ ते १५ मे. टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने या दोन जिल्ह्यांवर रत्नागिरीची मदार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित झाला आहे. त्याचे सॅम्पल तपासणीसाठी दिल्लीला पाठविणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. या सॅम्पल तपासणीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जाणार असल्याचेदेखील ते म्हणाले.