रत्नागिरी:- दिवाळीतील पावसाचा गोंधळ अजुनही सुरुच आहे. भाऊबिजेच्या मुहूतार्ंवर ढगांच्या गडगडाटासह जिल्ह्यात पावसाचा धुमाकुळ सुरुच आहे. दिवसभर कडकडीत उन्हाचा मारा सहन करणार्या जिल्हावासीयांना सायंकाळी अचानक मुसळधार पावसाला सामोरे जावे लागले. त्यामुळे दिवाळी उत्साहावर पाणी फेरले गेले. तर भात कापणीसह झोडणीच्या तयारी असलेल्या बळीराजाची तारांबळ उडाली होती.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीलाचा आलेल्या दिवाळी सणात जोरदार पावसाने गोंधळ घातला आहे. हवामान विभागाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली होती. ती तंतोतंत खरी ठरली असून चार दिवसांपुर्वी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मागील चार दिवस अधूनमधून पावसाची हजेरी ठरलेलीच आहे. दिवाळीला सायंकाळीही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर गुरूवारी (ता. 4) दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरीसह लांजा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. चिपळूणात तासभर कोसळलेल्या पावसामुळे दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. रत्नागिरीतही तिच परिस्थिती होती.
शुक्रवारी दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. हवेतील उष्माही वाढला होता. मात्र शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पारा 35 अंशावर गेला होता. उष्मा वाढल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. शनिवारी सांयकाळी चार वाजता पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. आज भाऊबीजेचा सण असल्यामुळे बाजारपेठेतील वातावरण शांत होते. चिपळूणात सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे भात कापणी करणार्या बळीराजाला त्याचा फटका बसला. कापणीनंतर सुकवण्यासाठी ठेवलेले भातही भिजले. तालुक्यात अनेक ठिकाणी दिवाळीपूर्व भात कापणीला सुरवात झाली. कापलेल्या भाताची उडवी रचलेली आहे. दिवाळी संपल्यानंतर भात झोडणी केली जाणार आहे. तत्पूर्वी पाऊस पडल्यानंतर कापलेला भातावर पाणी पडले आहे. पाऊस थांबल्यानंतरही विजांचा गडगडाट सुरू होता. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागाचा वीजपुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता. गडगडात थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. चिपळूण शहरासह सावर्डे, अलोरे, पोफळी, खेर्डी, शिरगाव, मार्गताम्हाने, पेढांबे, दसपटी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुढील काही दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात सायंकाळी पाच वाजता मुसळधार पावसाला सुरवात झाली. ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत होता. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत आणि भाऊबिजेसाठी बाहेर पडलेल्यांना कसरत करावी लागली होती. घरी परतण्यासाठी विविध बसथांब्यावर प्रतिक्षा करणार्या प्रवाशांची तारांबळ उडाली होती.









