रत्नागिरी:- हवामान विभागाच्या अंदाजानूसार जिल्ह्याच्या उत्तरेकडील काही तालुक्यांसह रत्नागिरी, संगमेश्वरसह लांजा, राजापूरात विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. ऐन दिवाळीत पडलेल्या पावसाने बाजारेपठांमध्ये तारांबळ उडाली होती. तर भात कापणी करणार्या बळीराजाला धक्का बसला असून सुखवण्यासाठी ठेवलेले भात भिजून गेले होते.
हवामान विभागाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार गुरुवारी (ता. 4) दुपारी अचानक पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात पडला. गेले दोन दिवस दिवसा कडकडीत उन पडत होते. हवेतील उष्माही वाढला होता. सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. पारा 34 अंशावर गेला होता तर किमान तापमान 22 अंशापर्यंत होते. उष्मा वाढल्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यात ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. गावखडी, गणपतीपुळे, जयगड, राजापूर तालुक्यात आडीवरेसह लांजा तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह सरी कोसळत होत्या. संगमेश्वरात तासाहून अधिक काळ पाऊस पडत होता. रत्नागिरी शहर आणि परिसरात सायंकाळी ढगाळ वातावरण होते. पण पावसाने हजेरी लावलेली नव्हती. सद्यःस्थितीत भात कापणीची कामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी कापलेले भात सुखवून उडवी करुन ठेवत आहे. अनेक शेतकर्यांनी दिवसा उन पडत असल्यामुळे भात कापून सुखण्यासाठी ठेवलेले होते. अचानक आलेल्या पावसाने भात भिजले आहे तर काही ठिकाणी उभे भात आडवे झाले आहे. सुदैवाने पावसाचा जोर अल्पकाळ राहत असल्यामुळे मोठे नुकसान अशक्य आहे.
पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार चिंतेेत पडला आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडी पडलेली नाही. त्यामुळे मोहोर प्रक्रिया लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.