तीन महिने पगाराविना; अनेकांपुढे मोठी अडचण
रत्नागिरी:- पगाराची तारीख उलटूनही एसटी कर्मचार्यांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा झालेली नाही. सातत्यानं तीन महिने हाच प्रकार सुरु राहिल्यामुळे सणावाराच्या दिवसांमध्ये कर्मचार्यांपुढे मोठी अडचण उभी राहिली आहे. अशा परिस्थितीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचार्यांनी सोमवारी आपापल्या घरासमोर कुटुंबासह आक्रोश आंदोलन केले.
कोरोना विषाणूच्या महामारी मध्ये एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहे. बेस्टमधील कर्मचार्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे रुपये 15 हजार 500 व 10 हजार 100 रु. सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. परंतु, एसटी कर्मचारी राज्यभर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत असूनही त्यांना माहे ऑगस्ट 2020 पासून तीन महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. दिवाळीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर आलेला असतानाही प्रशासनाकडून कर्मचार्यांच्या वेतनाबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. वेतनाबाबत संघटनेने वारंवार पत्र व्यवहाराद्वारे पाठपुरावा करूनही त्याची दखल एसटी प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांत प्रचंड असंतोष वाढला असून, प्रलंबित वेतन मिळण्यासाठी सोमवार दि. 9 नोव्हेंबर रोजी प्रलंबित वेतन व इतर आर्थिक लाभ मिळण्यासाठी कर्मचार्यांनी राहत्या घरी कुटुंबासह आक्रोश व्यक्त केला.
वास्तविक एसटी कामगारांना नियमित वेतन देणे हे कायद्याने एसटी प्रशासनावर बंधनकारक आहे. तसेच कामगार करारातील मान्य केलेल्या तरतुदी नुसार शासकीय कर्मचार्यांप्रमाणे महागाई भत्ता व सण उचल एस टी कामगारांना देणे आवश्यक आहे. शासकीय कर्मचार्यांना देण्यात आलेल्या 2 टक्के,3 टक्के, महागाई भत्त्याची थकबाकी अद्याप दिलेली नाही. तसेच शासकीय कर्मचार्यांना माहे डिसेंबर 2019 पासून लागू करण्यात आलेल्या वाढीव 5टक्के महागाई भत्ताही एस टी कर्मचार्यांना अद्याप लागू केलेला नाही तो थकबाकीसह लागू करणे आवश्यक आहे.