रत्नागिरी:- शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) एसटी संपाचा फटका बसला असून काही उमेदवारांना केंद्रांवर वेळेत उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांची टीईटीची संधी हुकली. जिल्ह्यातील १४ केंद्रांवर ३ हजार ९१९ परिक्षार्थी बसले होते.
टीईटी परिक्षेसाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले होते. या परिक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चौदा केंद्र निवडण्यात आली होती. सकाळी १०.३० वाजता पहिला पेपर होता तर दुपारी २ वाजता दुसरा पेपर होता. पहिल्या पेपरसाठी येणार्या काही उमेदवारांना एसटी बंदचा फटका बसला. एसटी अभावी अनेकांना वेळेत केंद्रांवर पोचता आले नाही. रत्नागिरी शहरातील एका परिक्षा केंद्रावर काही उमेदवार साडेदहा वाजण्याच्या दरम्यान पोचले होते. उमेदवारांनी आमचे नुकसान करू नका अशी विनंती केंद्र प्रमुखांकडे केली होती. मात्र त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्या शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक शिक्षक खासगी वाहनाने परीक्षा केंद्रावर पोचले होते; परंतु टीईटी परिक्षेसंदर्भातील निकषांमध्ये परिक्षा केंद्रावर आलेल्या प्रत्येक उमेदवाराला १०.१० वाजेपर्यंत प्रवेश देण्याच्या सुचना होत्या. काही ठिकाणी त्यातही सुट मिळाली होती. स्थानिक पातळीवर अधिकार नसल्याने उशिरा आलेल्यांना माघारी परतावे लागले. रत्नागिरी शहरातील टीईटीसाठी सात केंद्रावर पेपर १ साठी १ हजार ९६६ पात्र उमेदवारांपैकी १ हजार ६४४ हजर राहीले तर ३२२ अनुपस्थित होते. पेपर २ साठी १ हजार ९५३ पैकी १ हजार ६५९ उपस्थित होते आणि २९४ अनुपस्थित होते.