एसटी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी ओबीसी संघर्ष समिती घेणार पुढाकार

रत्नागिरी:- एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणासाठी तीन महिने बंद सुरू आहे. यामुळे सर्व सामान्याची गैरसोय होत असून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन जनतेचे हाल, त्रास दूर करून दिलासा द्यावा, म्हणून रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समितीने पुढाकार घेतला आहे. तोडगा निघण्यासाठी गुरूवारी (ता. १०) सकाळी दहा वाजता माळनाका एसटी आगार येथुन विविध विद्यार्थी संघटना, एसटी कर्मचारी, व्यापारी संघटना, शिक्षक संघटना, कर्मचारी, कामगार व सर्व जातीच्या संघटना एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत, अशी माहिती ओबीसी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांनी दिली.  

जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी, रघुविर शेलार, राजू कीर, श्री. वासावे, शांताराम मालप अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मोहिते म्हणाले, सामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तसेच इतर मागासप्रवर्गावर गेले कित्येक वर्ष शासनाकडुन अन्याय होत आला  आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रत्नागिरी तालुक्यात ओबीसी संघर्ष समिती संघटना काम करीत आहे. गेले तीन महिन्यात संघर्ष समितीच्या वतीने लोककल्याणकारी विविध उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबवण्यात आले. सामान्य जनतेच्या प्रश्न काय आहेत हे जनतेला पटलेले आहे. त्यामुळे ओबीसी संघर्ष समितीला मोठ्या संख्येने जनतेचा पाठिंबा मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गेले तीन महिने एसटी कामगार रस्त्यावर बसून सनदशीर मार्गाने आपल्या मागण्यासाठी लढत आहेत. तीन महिन्यात कर्मचारी, कष्टकरी वर्ग, वैद्यकीय उपचार घेणारे रुग्ण, प्रवासी, कारागिर, मजूर, सामान्य नगारिक हे सर्व वाहतुकीची व्यवस्था नसल्याने अडचणीत आले आहेत. त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

शासनाकडुन होणारी ही जनतेची पिळवणूक आहे. त्यामुळे एसटी. कार्मचारी यांच्या विविध मागण्यांचे आंदोलन हे आता सर्वसामान्यांचे आंदोलन झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर वेळीच तोडगा काढुन सामान्य जनतेची होणारी पिळवणूक शासनाने थांबवावी, यासाठी गुरूवारी ( ता.१०) सकाळी दहा वाजता माळनाका एसटी आगार येथे विविध विद्यार्थी संघटना, एसटी कर्मचारी, व्यापारी संघटना, शिक्षक संघटना, कर्मचारी, कामगार व सर्व जातीच्या संघटना एकत्र जमून जिल्हाधिकारी यांना सनदशीर मार्गाने निवेदन देण्यास येणार आहेत. तरी शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन जनतेचे होत असलेले हाल दूर करून सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे.  याला विविध शैक्षणिक व इतर संस्थांनी पाठिंबा दिला आहे, असेही मोहिते यांनी सांगितले.