एसटी बस- ओमनी अपघातात पाच जण जखमी

लांजा:- एसटी बस आणि ओमनी कार यांच्यात झालेल्या अपघातात ओमनी कार मधील पाच जण जखमी झाल्याची घटना लांजा तालुक्यातील खावडी येथे झाली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून हा अपघात शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झाला.

लांजा बस स्टँडमधून सुटलेली लांजा बापेरे ही एसटी बस बापेरे येथे जात असताना खावडी येथील एका वळणावर खावडी येथुन लांजा कडे येणाऱ्या ओमनी क्रमांक (एमएच.०४.एपी.९५६६) आणि एसटी बस (एमएच.१४.बीटी.२२८६) यांच्यात अपघात झाला. ही एसटी बस विनोद पांडुरंग पाटील (वय-४०, रा. कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली, लांजा आगार) हे चालवित होते. या अपघातामध्ये ओमनी कार मधील पाच जण जखमी झाले असून यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या अपघातात संतोष शांताराम नामे (वय ३५, राहणार खावडी), आत्माराम महादेव पळसमकर (वय ६५ राहणार निवोशी), प्रदीप राजाराम करंबे (वय ३२, राहणार खावडी, शुभांगी संतोष नारकर (वय ५७, मुंबई) आणि ललिता लक्ष्मण तांबे (वय ४०, राहणार निओशी) असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत.