एसटी प्रशासनाकडून 27 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरी:- रत्नागिरी : शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलाय. रत्नागिरीत चार दिवसांपासून हा बंद सुरू असून बंद मोडून काढण्यासाठी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. राजापुरात जाणाऱ्या एसटी चालक, वाहकांचा सत्कार केल्याबद्दल रत्नागिरीतील 18 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तर राजापूरातील 9 कर्मचाऱ्यांनाही निलंबित केले आहे.

जिल्ह्यातील एसटीची वाहतूक 100 टक्के बंद आहे. मात्र आता कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करत निलंबनाची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मंगळवारी (ता.9) राजापूर आगाराची बस रत्नागिरीतून राजापूरला जात असताना आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी मारुती मंदिर येथे या गाडीचे चालक प्रशांत शेट्ये व वाहक विजय शिंदे देसाई यांना बसमधून उतरवले. तसेच महाराष्ट्रात कामबंद आंदोलन सुरू असताना तुम्ही ड्युटी का करता अशी विचारणा केली व त्यांना हार घालून अपमानीत केले. एसटी खात्याच्या कामकाजामध्ये अडथळा आणला. त्यामुळे 10 नोव्हेंबरला दुपारपासून 18 कर्मचाऱ्यांना वाहतूक अधीक्षकांनी निलंबित केले आहे. या कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांनी ठरवून दिलेल्या वेळेत रत्नागिरी आगारामध्ये हजर राहावयाचे आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला.