दापोली:- दापोली- मंडणगड रस्त्यावर खेर्डीनजीक एसटी बस व दुचाकीचा अपघात झाला. 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता झालेल्या या अपघातातील दुचाकीस्वाराचा 7 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली एसटी डेपोमधील लक्ष्मण बापू गायकवाड हे बोरिवली ते दापोली (गाडी क्रमांक एमएच 14 / BT / 2538) 6 नोव्हेंबर रोजी दापोलीकडे घेऊन येत होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मंडणगड- दापोली रोडवरील खर्डीनजीक इंग्लिश स्कूल येथे पोहोचले. यावेळी समोरून येणाऱ्या साद इकबाल हुसेन (वय 25 , राहणार काळकाई कोंड आजाद नगर) हा दापोलीकडून मंडणगडकडे दुचाकीने जात होता. दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येऊन एसटी बसच्या पुढील चाकाच्या गार्डवर आदळली. यामध्ये दुचाकी स्वाराच्या पोटाला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी डेरवण येथे हलवण्यात आले असता दि. 7 नोव्हेंबर 2022 रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल बुरटे हे करीत आहेत.









