कारवाईचा बडगा, रत्नागिरी आगारच १०० टक्के बंद
रत्नागिरी:- एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन किंवा सेवासमाप्त करूनही म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने आता प्रशासनाने बदल्यांच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. चालक, वाहकांसह कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यातच बदल्या करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. दोन दिवसांत २० जणांच्या बदल्या जिल्ह्यातीलच आगारांत करण्यात आल्या आहेत. यामध्ये चालक ५, वाहक ७, चालक कम वाहक १, तांत्रिक २, प्रशासकीय ४, पर्यवेक्षक १ यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज २७ व्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरू राहिले. यामुळे एसटीची सेवा ठप्प झाली आहे. मंडणगडमधून काही फेऱ्या सोडण्यास सुरवात झाल्याने आता फक्त रत्नागिरी आगारच १०० टक्के ठप्प आहे. अन्य आगारांतून एसटी बस सोडण्यात येत आहेत. दररोज सुमारे दोन हजार प्रवाशांना सेवा देण्यात येत आहे. परंतु कर्मचारी काम बंद आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. प्रशासनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी आगारातील सहाय्यक वाहतूक अधीक्षक भाग्यश्री प्रभुणे यांनी सांगितले की, आम्ही दररोज चालक, वाहकांशी फोनवरून संपर्क साधत आहोत. त्यांना व्हॉटसअप व टेक्स्ट मेसेज पाठवले आहेत. कामावर हजर व्हा, एसटी बस फक्त चालू करून बघा, असे आवाहन करत आहोत. कारण गाड्या गेले २७ दिवस बंद असून त्यात बिघाड व्हायला नको म्हणून किमान बस चालू करून पाहणे आवश्यक आहे. विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयात असल्यामुळे अद्याप निर्णय प्रलंबित आहे. परंतु कर्मचारी तेच कारण सांगतात. त्यांचे प्रबोधन आम्ही करत आहोत.
रत्नागिरी आगारातील ४० कर्मचारी निलंबित, ३६ जणांची सेवासमाप्त करण्यात आली असून ३ जणांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. येथे १३ कर्मचारी कामावर हजर झाले असून कार्यशाळेतील ३ कर्मचारी आहेत. ते दररोज बस चालू करून देखभालीचे काम करत आहेत. जेणेकरून गाड्यांची दुरुस्ती व देखभाल चांगली होईल आणि चालक, वाहक कामावर हजर झाल्यावर लगेचच वाहतूक सुरळित करण्यात येईल.