रत्नागिरी:- गेली अनेक वर्षे एसटी महामंडळाकडे एका कंपनीव्दारे आगारांना डिझेल पुरवठा केला जात होता. महामंडळाकडून बिले द्यायला उशीर झाला की, डिझेल पुरवठा खंडित केला जात होता. मात्र, रत्नागिरीत आगारात एसटीच्या नवीन पंपाला मंजुरी मिळाली असून येत्या काही दिवसात काम पूर्णत्वाला जाणार आहे. त्यामुळे महिनाभरात एसटीला आपल्या हक्काच्या पंपात डिझेल भरता येणार असल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाकडून देण्यात आली.
एसटी महामंडळाचे रत्नागिरी जिल्ह्यात स्वत:चे पंप नव्हते. डिझेलचे टँकर नियमितपणे रत्नागिरी आगारात दाखल होत होते. मात्र, कोरोना काळात बिले थकल्याने डिझेल पुरवठा करणे संबंधित कंपनीने बंद केले. त्या नंतर महामंडळाने खासगी पेट्रोल पंपांवर डिझेल भरण्यास काही महिन्यांपासून सुरु केले आहे. आता नियमितपणे सर्व एसटीच्या गाड्या खासगी पेट्रोल पंपात डिझेल भरत आहेत. रत्नागिरी येथील आगारालगत सुरु होणार्या नवीन डिझेल पंपात सीएनजी देखील आता नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून अधिकचे उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा होणार आहे. यापुढे एसटीला डिझेलसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार आहे.