रत्नागिरी:- एसटी काम बंद आंदोलनाचे पन्नास दिवस मंगळवारी पूर्ण झाले. आजही फारशा एसटी सुरू झालेल्या नाहीत. काही प्रमाणात कर्मचारी कामावर हजर होऊ लागले आहेत. एसटी विभागात आज ६४२ कर्मचारी हजर होते. अजूनही कर्मचारी ५ जानेवारीला न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे डोळे लावून बसले आहेत. आर्थिक विवंचनेमुळे काही कर्मचाऱ्यांनी मुदतठेव रक्कमा मोडण्यास सुरवात केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही नाराजीचा सूर आहे.
एसटी विभागात आज प्रशासकीय २५६, कार्यशाळा २०२, चालक, ७४, वाहक ७२, चालक तथा वाहक ३७ असे ६४२ कर्मचारी हजर होते. अधिकृत रजेवरील कर्मचाऱ्यांची संख्या आज ८८ होती. अद्यापही २९४३ कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत. काही ज्येष्ठ कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना ते कामावर हजर होण्यास तयार आहेत. परंतु बंद आंदोलन काळातील कारवाई प्रशासनाने बिनशर्त मागे घेण्याची त्यांची मागणी आहे. तसेच वेतनवाढ अजून काही प्रमाणात व्हायला हवी, असेही काहींनी सांगितले. गेल्या पन्नास दिवसांचे कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नसल्याने इंग्रजी नववर्षाच्या प्रारंभी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होणार नाही. त्यामुळेही काही ज्येष्ठ कर्मचारी नाराज आहेत.
कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटनेचे नेते गुजर यांनी आंदोलनातून माघार घेतल्याने सध्या कृती समितीचे नेते आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. गुजर यांच्या संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्यात सभासद नसल्याने बहुतांशी कर्मचारी आंदोलनात सक्रिय आहेत. दरम्यान एसटी महामंडळाने बडतर्फ, निलंबन, बदली अशी कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित एसटी आगाराकडे पत्र दिले आहे. या पत्रानुसार अशी कारवाई चुकीची असून आम्ही दुखवट्यात असल्याने प्रशासनाने आकसापोटी कारवाई केली असल्याने ती मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. परंतु कामगार कामावर हजर होण्यास तयारही नाहीत.









