रत्नागिरी:- एसटी प्रशासनाकडे बाजू न मांडता थेट सोशल मिडियावर एसटीच्या वाहतुकीबाबत प्रवाशांमध्ये गैरसमज पसरवणारा व्हिडिओ व्हायरल करणे देवरुखच्या एसटी चालाकाला महागात पडले आहे. एसटी प्रशासनाने या चालकाला तत्काळ निलंबित केले आहे. पुणे मार्गावरील बस नादुरूस्त आहेत. या बसने प्रवास करणे धोकादायक आहे, असा व्हिडिओ व्हायरल केला आहे. नादुरूस्त गाड्यांबाबत देवरुख आगर प्रमुखांकडे नोंदणी करूनही दुरूस्त होत नव्हती, अशी चालकाची तक्रार असल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमल्याची, माहिती एसटी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
पुणे रुटला धावणारी बस नादुरूस्त असून या बसने प्रवास करू नका, अन्यथा जीवाला मुकाल असा
व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर एस्. टी. प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. ड्युटी
बदलल्याच्या रागातून चालकाने हा प्रताप केल्याचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले. दोन
दिवसांपासून सोशल मिडियावर देवरूख आगारातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये चालकाने देवरुख-पुणे व देवरुख-साखरपा मार्गे अर्नाळा या एसटी बसने प्रवास करू नका, प्रवास टाळा व स्वतःचे जीव वाचवा, असे या चालकाने व्हिडिओमध्ये आवाहन केले आहे. देवरुख आगाराचे चालक अमित आपटे यांचा हा व्हिडिओ सध्या खळबळ माजवणारा ठरला आहे. या मार्गावरील एसटी बसेसबाबत अनेकदा ब्रेकडाऊनसारखे गंभीर प्रकार घडत आहेत. मात्र याकडे आगार व्यवस्थापक लक्ष देण्यास तयार नाहीत, अशा स्वरूपाचे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मोठ्या अपघाताची शक्यता देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या मार्गावर धावणार्या एसटी बसेस अनेकदा बिघडत असतात व त्याची तक्रार केल्यानंतर आगार व्यवस्थापक आमच्यावरतीच कारवाई करतात, असा गंभीर आरोप चालक अमित आपटे यांनी या व्हिडिओ मधून केला आहे. एसटी बसेसला बिघाड आहे, या गाड्या या मार्गावरती पाठवू नका असं सांगितल्यावरती हा आगार व्यवस्थापक आमच्यावरतीच कारवाई करत आहेत. गाड्या दुरूस्तीबाबत तक्रार केली की, यांना ड्युटी लावू नका, यांना लोकला पाठवा आणि पुणे व अर्नाळा आणि या मार्गावरती नवीन लोकांना ड्युटी लावण्याचे काम सुरू आहे, असे आरोप व्हिडिओद्वारे करण्यात आले आहेत.
याबाबत आगार व्यवस्थापन श्री. बोरसे म्हणाले, देवरुख आगार प्रमुख तक्रारीकडे दुर्लक्ष करती असेल, तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करायला हवी होती. चुकीच्या मार्गाने त्यांनी तक्रार माडंली आहे. थेट सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हे एसटीसाठी धोकादायक आहे. म्हणून आम्ही तत्काळ संबंधित चालकावर कारवाई करून त्याला निलंबित केले आहे. त्याने केलेल्या तक्रारीचा विचार करू चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. हा चालक वाद्ग्रस्त असून २०१३ ला त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. कोरोना काळातही त्याने काही आरोप केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.









