रत्नागिरी:- एसटी प्रवासात आतापर्यंत चालक एसटी चालवत असताना विविध घटना घडत असतात. मात्र, मंगळवारी एक वेगळी घटना घडली. सकाळी 7.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे नोकदार वर्ग, सामान्य प्रवासी रत्नागिरीला एसटीने जात होते. मात्र, अचानक एका प्रवाशास अस्वस्थ वाटू लागले. ही गोष्ट वाहकाच्या लक्षात येताच, चालक व वाहक यांनी माणुसकीचे दर्शन देत एसटी बस थेट शासकीय रूग्णालयात अपघात विभागासमोर नेऊन त्या व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल केले. या प्रसंगावधनासाठी चालक-वाहकाचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रवाशांची सेवा करण्याचा वसा राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. तसे कामकाज ही सुरू आहे. दरम्यान, एसटी बसमध्ये गळती झाली, चालक-वाहकांत वाद, भांडण, चालक दारू पिऊन गाडी चालविणे अशा घटनांच्या बातम्या आपण सोशल मीडियावर पाहिल्या असतील. मात्र, अशातच एसटी कर्मचार्यांनी माणुसकीचे दर्शन रत्नागिरी आगाराच्या कर्मचार्यांनी या प्रसंगातून घडवले.
रत्नागिरी तालुक्यात करबुडे येथे नेहमीप्रमाणे वस्तीला जाणारी एसटीबस सकाळी वस्तीवरून रत्नागिरीसाठी निघाली. प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच बसमध्ये एक ताडपत्री विकणारा प्रवासी एसटी बसमध्ये चढला. पण, काही वेळ बसल्यानंतर त्या व्यक्तीला अचानक अस्वस्थ वाटू लागले. ही गोष्ट वाहकाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने वेळ न घालवता एसटी बस थेट शासकीय रूग्णालयातील अपघात विभागात घेऊन उपचारार्थ दाखल केले. त्यांच्या सतर्कतेमुळे त्या प्रवाशावर वेळेत उपचार झाले आणि चालक-वाहकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.