एसटीच्या हायटेक प्रकल्पाला गती मिळेना

पुन्हा काम बंद; हवा वाढीव दर, ४ दिवसात काम सुरू

रत्नागिरी:- एसटी बसस्थानकाच्या १० कोटीच्या हायटेक प्रकल्पाच्या बांधकामाला गती मिळत. जुन्या दराप्रमाणे काम करणे ठेकेदाराला परवडत नसल्याने महामंडळाकडे वाढीव दराची मागणी केली आहे. मात्र करारामध्ये असलेल्या अटी-शर्थीच्या अधीन राहून ठेकेदाराला काम करावा लागणार आहे. दसऱ्यापर्यंत रडतखडत काही कामगार काम करीत होते. मात्र आता पुन्हा हे काम बंद आहे. येत्या चार दिवसांमध्ये ते पुन्हा सुरू होईल, असा विश्वास एसटी महामंडळाच्या येथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

एसटी बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या हायटेक प्रकल्पाच्या बांधकामाला कोरोनाचा फटका बसला. त्यानंतर रेंगाळलेल्या या कामाला अजुनही गती मिळालेली नाही. कोरोना महामारीमुळे कामाला ब्रेक लागला. कामगार मिळत नसल्याने काम रखडले होते. तसेच ठेकेदाराचे थकलेले ४० लाखाचे बिल देण्यात आले आहे. जनतेशी थेट संबंधित असलेला हा 10 कोटीचा नूतन बसस्थानकाचा प्रकल्प कामाच्या गतिच्या प्रतिक्षेत आहे. हायटेक बसस्थानकाच्या 10 कोटीच्या या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन तत्कालीन पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांसमोर झाले. आराखड्यामध्ये काही त्रुटी निघाल्या होत्या. शॉपिंग सेंटर किंवा व्यापारी गाळे आत ठेवण्याऐवजी दर्शनी भागी उभारून एसटी आत आणि बाहेर जाण्यासाठी मार्ग करण्याचे सुचविण्यात आले आहे. त्यानुसार नवीन आराखडा करून प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कोल्हापूरच्या ठेकेदाराला याचा ठेका देण्यात आला. सुरवातीला काम चांगल्या पद्धतीने सुरू होते. परंतु त्यानंतर ते रेंगाळले ते अजून तसेच आहे.  त्यामुळे एसटी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना थांब्यावर वाद निर्माण होत आहेत. अजूनही निवारा शेडचीही व्यवस्था झालेली नाही.

एसटी पार्किंगसाठी पालिकेकडे मागण्यात आलेली जागादेखील पालिकेने नाकारली. त्यामुळे कामाच्या ठिकाणीच गाड्या पार्किंग करून ठेवल्या जाऊ लागल्या. त्यानंतर बांधकामाची गंती मंदावली. अखेर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून सामंत यांनी स्वतः कामाची पाहणी केली. या वेळी ठेकेदाराची चांगलीच कान उघाडणी करून त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एका अधिकार्‍याची नियुक्ती केली.  त्यानंतर कामाला काहीशी गती मिळाली. परंतु कोरोना महामारीचे संकट आले आणि कामाला पुन्हा खो मिळाला. जेवढे कामगार होते ते कोरोनाच्या भीतीने निघून गेले. तसेच ठेकेदाराने केलेल्या कामाचे सुमारे 40 लाखाचे बिलदेखील एसटी महामंडळाकडून रखडले होते. मात्र ते आता मिळाले असले तरी अजुनही या नुतन बसस्थानकाच्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही.

ठेकेदाराने मोजक्याच कामगारांच्या माध्यमातून हळुहळु काम सुरू ठेवले आहे. आता दसऱ्याच्या सुट्टीला कामगार गेले ते आलेलेच नाही. त्यामुळे पुन्हा काम थांबले आहे. दरम्यान जुन्य दराप्रमाणे काम होत आहे. दोन वर्षांमध्ये साहित्याचे दर वाढले असून वाढीव दर मंजूर करण्यात यावा,  अशी मागणी ठेकेदाराने केली आहे.  मात्र कराराप्रमाणे सर्व अटी-शर्थी मान्य केल्याने जुन्या दरात त्यांना काम करावे लागणार आहे. येत्या चार दिवसात पुन्हा काम सुरू होईल, असा दुजोरा येथील एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला.