रत्नागिरी:- एसटी कामगारांच्या काम बंद आंदोलनाचा शनिवारी २५ वा दिवस होता. या दिवशी कामगार मोठ्या संख्येने माळनाका येथील विभागीय कार्यालयाबाहेर उपस्थित होते. या सर्व आंदोलनाची स्थिती जैसे थे आहे. कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आज ४४६ होती. गेल्या चार दिवसांत ही संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. काल नव्याने १६ कामगारांना निलंबित करण्यात आले आहे.
शनिवारी दिवसभरात रत्नागिरी एसटी विभागात १८२ फेऱ्या सोडण्यात आल्या. यामधून सुमारे १२०० प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली. तसेच आज १६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून आता निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या २६५ झाली आहे. आज कोणत्याही कर्मचाऱ्यांची सेवासमाप्त करण्यात आलेली नसून त्यांची एकूण संख्या २३३ आहे.
एसटीच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे कर्मचारी आमचेही नुकसान होत असल्यामुळे आंदोलन करत आहोत. विलीनीकरणाच्या मुद्द्यावरच ते ठाम आहेत. परंतु सर्व संघर्षात बाजारपेठ, प्रवासी आणि सामान्य जनता भरडली जात असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
परिवहनमंत्र्यांनी वेतनवाढ जाहीर केल्यानंतर ज्येष्ठ कर्मचारी हजर होण्याच्या विचारात होते. हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढणे अपेक्षित होते. परंतु नव्याने भरती झालेले कर्मचारी हजर व्हायचे नाही, या मुद्द्यावर ठाम राहिले. त्यामुळे सर्व संघटनांची ताकद एकत्र पाहायला मिळाली. ४९५ कर्मचारी हजर झाले होते. परंतु ही संख्या गेल्या चार दिवसांत कमी होत असल्याचे दिसत आहे. काही जणांची आठवडा सुट्टी आहे, असे गृहित धरले तरीही संख्या कमी होत असल्याने प्रशासनालाही अडचणी जाणवत आहेत.
मेस्माअंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची बातमी टीव्हीवरून दाखवण्यात आली. त्यानंतर रत्नागिरीमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली होती. मात्र मेस्मा हा अत्यावश्यक सेवा कायदा आहे आणि महामंडळाचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा अधिनियम १९५५ अंतर्गत येत नाही. त्यामुळे याअंतर्गत कारवाई करता येणार नाही, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. एका कर्मचाऱ्याने माहितीच्या अधिकारात अत्यावश्यक सेवेबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर महामंडळाने कर्मचारी हे उत्तर दिले होते, असा दाखला रत्नागिरीतील कर्मचाऱ्यांनी दिला.