एसटीचा नवा फंडा; विकणार ‘नाथजल’ पाणी 

रत्नागिरी:- एसटीने तोटा भरून काढण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी आणखी एक अफलातून फंडा आणला आहे. माल वाहतूक, खासगी टायर रिमोर्ट, खासगी गाड्यांच्या बॉडी बांधणे, वाहनांची दुरुस्ती एसटी वर्कशॉपमध्ये सुरू करण्याचे विचाराधीन असताना प्रवाशांना स्वस्त दरात शुद्ध ‘नाथजल’ पाणी देण्याचा नवा फंडा एसटी महामंडळाने सुरू केला आहे. टप्प्याटप्प्यात लवकरच एसटीच्या प्रत्येक बसस्थानकात ते विक्रीस ठेवले जाणार आहे. त्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही पाणी विक्रीसाठी ठेवणार्‍यावर कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात एसटीच्या प्रत्येक बसस्थानकात लवकरच हे नाथजल पाणी येणार आहे. बसस्थानक आवारातील उपाहारगृह, हॉटेल, स्टॉलवर हे पाणी उपलब्ध असणार आहे. अन्य कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विक्रीसाठी ठेवल्यास विक्रेत्याचे परवाने रद्द करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत. दीड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महामंडळाची बाटलीबंद पाणी विक्रीची योजना प्रत्यक्ष अंमलात आली आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते. त्याच्या आदराप्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास ‘नाथजल’ हे नाव दिले आहे. प्रवाशांना एक लिटर बाटलीबंद पाणी 15 रुपयात मिळणार आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात राज्यातील सात एसटी विभागातील बसस्थानकात ही सोय सुरू केली आहे.

जिल्ह्यात लवकरच रत्नागिरी एसटी आगारामार्फत 11 बसस्थानकात नाथजल बाटलीबंद पाणी मिळणार आहे. तशी तयारी करण्याची सूचना महामंडळाने एसटी विभागाला दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ही योजना अन्य सात विभागात सुरू होणार असून लवकरच ती कोकण विभागात सुरवात केली जाणार आहे. कोरोना महामारीमुळे एसटीचा आर्थिक पाय आणखी खोलात आहे. यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळ पर्याय शोधत आहे.