एलईडी लाईट लावून मासेमारी करणार्‍या नौकांवर धडक कारवाई

रत्नागिरी:- एलईडी लाईट लावून मासेमारी करणार्‍या नौकांवर धडक कारवाईची मोहिम मत्स्यव्यवसाय विभागाने सुरु केली आहे. सलग तीन दिवस कारवाई करुन जनरेटरसह लाईट जप्त केले आहेत. सहाय्यक आयुक्त श्री एन व्ही भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली आहे.

दि. २१ मार्च रोजी मासेमारी नौकेमध्ये जनरेटर चढविणार्‍या क्रेनवर व जनरेटर वाहतुक करीत असलेल्या वाहनावर स्वत: सहायक आयुक्त यांनी पाठलाग करून कारवाई केली व दोन्ही वाहने जनरेटर सह ताब्यात घेण्यात आली. दि. २२ मार्च रोजी रोजी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी श्री. जे. डी. सावंत व सहाय्यक आयुक्त श्री. एन. व्ही. भादुले यांनी रात्रीच्या वेळी अकरा नॉटिकल माईल मध्ये खोल समुद्रात एलईडी लाईट लावलेल्या नौकेवर कारवाई करण्यात आली. या नौकेवरील सर्व साधन सामूग्री जप्त करुन नौका जप्त करण्यात आली आहे.
दि. २३ मार्च रोजी बंदरात छुप्या पद्धतीने उभ्या असलेल्या एलईडी जनरेटर असणार्‍या नौकेवर कारवाई करणेत आली व सदर नौकेवरील सर्व साधन सामूग्री जप्त करुन नौका जप्त करण्यात आली आहे.
तीन दिवस तीन वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करुन सुमारे बारा लाख रुपयाची सामग्री जप्त करण्यात आली आहे. हि कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली मत्स्य प्रशिक्षण अधिकारी, मत्स्य विकास अधिकारी व सर्व अंमलबजावणी अधिकारी रत्नागिरी यांनी संयुक्तरित्या केली.