एमटीडीसीच्या निवासस्थानात महिलांना मिळणार पन्नास टक्के सवलत 

महिला दिनानिमित्त ६ ते १० मार्चपर्यंत योजना 

रत्नागिरी:-महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) निवासस्थानात वास्तव्य करणार्‍या महिलांना पन्नास टक्के आरक्षण देेण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ६ ते १० मार्च या कालावधीत ही योजना लागू राहणार असल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले.

‘आजची लैंगिक समानता, उद्याची शाश्वती’ अशी संकल्पना घेऊन यंदाचा जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा करण्यात येणार आहे. सगळ्याच क्षेत्रात अग्रेसरपणे, खंबीरपणे सामना करणार्‍या महिलांना अधिक सक्षम करणेकरीता तसेच त्यांच्याप्रति असलेला आदर, सन्मान, प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रयत्नशील असणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा घेण्यात आला. यामध्ये ६ मार्च ते १० मार्च या पाच दिवसांच्या कालावधीत महामंडळाच्या पर्यटक निवासात वास्तव्यास येणार्‍या महिला अतिथिना आणि त्यांच्या परिवाराला निवासकक्ष आरक्षणावर ५० टक्के सूट देण्याबाबत येणार आहे. ही सुट फक्त निवास कक्ष आरक्षणावरच आहे. उपहारगृहांमधील सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांचे दर पूर्णतः आकारण्यात येणार आहेत. आपल्या पर्यटक निवासात महिला अतिथीचे आगमन होताच त्यांचे विशेष स्वागत करण्यात येणार आहेत. महिला दिनाच्या औचित्याने देण्यात आलेल्या आरक्षण सवलतींना अनुसरून एखाद्या महिलेने कक्षाचे आरक्षण केल्यास आरक्षण रद्द करता येणार नाही. तसेच ज्या महिलांच्या नावे आरक्षण असेल त्या महिलांनी ओळखपत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य राहील. याची ऑनलाईन नोंदणीही करता येईल. महामंडळाद्वारे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या पर्यटक निवासासाठी लागु राहणार नाहीत. ही सवलत फक्त निवास कक्ष आरक्षणास वैध असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपतीपुळे, तारकर्ली, कुणकेश्‍वर येथे एमटीडीसीची निवासस्थाने आहेत.