रत्नागिरी:- फिश मिलमध्ये मच्छी सुकवण्याचा ड्रायर साफ करीत असताना ड्रायर अचानक सुरू झाला आणि २ कामगार त्यामध्ये चिरडले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना एमआयडीसीतील टी.जे. मरीन कंपनीत घडली.
शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या टी.जे. मरीन या फिशमिलमध्ये २ कामगार गुरूवारी मच्छी सुकवण्याचा ड्रायर साफ करत होते. ड्रायर साफ करत असताना अचानक ड्रायर सुरू झाला आणि संतोष विश्राम घवाळी (वय ३७, रा. पानवल) हा कामगार ड्रायरमध्ये अडकला. ड्रायर सुरू झाल्याने त्याच्या शरीराचा अर्धा भाग चिरडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला व त्याचा दुसरा सहकारी सुमित अनंत पांचाळ (वय २५, रा. कुवारबांव) हा गंभीर जखमी झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत संतोष घवाळी याचा मृतदेह कापडात बांधून जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला. याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, २ कामगार काम करीत असताना अचानक ड्रायर कसा सुरू झाला? असा प्रश्न असून कोणीतरी हा ड्रायर सुरू केला असावा असा संशयदेखील व्यक्त केला जात आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.