रत्नागिरी:- जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडला नसल्याने जिल्ह्याला पाणी टंचाईची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. उष्णतेमुळे अनेक धरणातील पाणी साठ्यानेही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. एमआयडीसीच्या धरणांमधीलही पाणीसाठा कमी झाल्यामुळे, मिरजोळे व उद्यमनगर औद्योगिक वसाहत आणि या धरणावर अवलंबून असणार्या ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
मान्सून लांबल्यामुळे आणि मान्सूनपूर्व पावसाचेही आगमन न झाल्यामुळे यावर्षी पाणी टंचाईचा सामना जिल्ह्याभरात करावा लागत आहे. त्यातच प्रचंड उष्णतेमुळे धरणातील पाणीसाठाही कमालीचा घटत आहे. याचा फटका पाणी योजनांना बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात आली आहे.
गाळाचा परिणाम आता हरचिरी धरणातील पाणी साठ्यावर झाला आहे. त्यामुळे आता एमआयडीसीलाही पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 9 जून आला तरी जिल्ह्यात मान्सूनचा थांगपत्ता लागलेला नाही. मान्सून सक्रीय होण्यास आणखी किमान सहा ते सात दिवस लागण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊसही न पडल्याने आता धरणातील पाणी कमी झाल्यामुळे एमआयडीसीही पाणी कपात करण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे.
जिल्ह्यातील उद्योग व्यवसायांनाही विविध धरण क्षेत्रातून पाणी पुरवठा सुरु आहे. यातील रत्नागिरीतील मिरजोळे व उद्यमनगर एमआयडीसीला हरचिरी धरणामधून पाणी पुरवठा केला जातो. या धरणाचीही पाणी पातळी कमी झाली आहे. मुळात या धरणामध्ये मोठ्याप्रमाणात गाळ असून, तो उपसण्याची परवानगी मागील तीन-चार वर्ष महसूल विभागाकडून एमआयडीसीला मिळालेली नाही.