रत्नागिरी:- परिवहन आयुक्त कार्यालयाने एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक १४ ऑगस्ट रोजी जारी केले आहे. यानुसार, वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. त्यासाठी आता अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
परिपत्रकानुसार, ज्यांनी अद्याप आपल्या बाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. या मुदतीनंतरही जे वाहनधारक ही नंबर प्लेट बसवणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी १५ ऑगस्ट पर्यंत ही मुदत होती, जी आता वाढवण्यात आली आहे. वाहनांची सुरक्षा वाढवणे, गुन्हेगारी कमी करणे, आणि वाहनांची ओळख सुलभ करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.









