एक रुपयांचीही करवाढ नसलेल्या रनपच्या अंदाजपत्रकाला मान्यता 

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सन 2020-21 च्या 25 लाख 93 हजार 636 रुपयांच्या अंदाजपत्रकास गुरूवारच्या सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली. 163 कोटी 49 लाख रुपये जमेचे आणि 140 कोटी 37 लाख रुपये खर्चाचे हे अंदाजपत्रक आहे. कोरोनावरील खर्चाने आधीच कोट्यवधीचा खर्च झाला आहे. त्यात करवसुली जेमतेम 40 टक्केच असताना एक रुपयाचीही करवाढ केली नसल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. त्याचबरोबर रनपची नवीन भाजी मार्केट इमारत जीर्ण होऊन पूर्णपणे धोकादायक झाल्याने ती पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यासही या सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली आहे.

पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रदीप उर्फ  बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. पहिल्या अंदाजपत्रकीय बैठकीत 25 लाख 93 हजार 636 रुपये शिलकी अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली. या अंदाजपत्रकीय बैठकीत माहिती देताना नगराध्यक्ष म्हणाले की, गेल्यावर्षीच्या आर्थिक वर्षात कोरोना संकट आले. आता पुन्हा त्याच कालावधीत हे संकट घोंगावू लागले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी रनपने कोट्यवधी रुपये खर्च करून उपाययोजना केल्या आहेत. त्याचवेळी वेगवेगळ्या करांची वसुलीही कोरोना संकटामुळे अपेक्षित प्रमाणात होवू शकलेली नाही.  तरीही एकही रुपया कराचा बोजा लादण्यात आला नसल्याचे नगराध्यक्षांनी सभेवेळी सांगितले. हा मंजूर अर्थसंकल्प जिल्हाधिकार्‍यांच्या मंजूरीसाठी पाठवण्याचाही ठराव करण्यात आला.

अंदाजपत्रकाला मंजूरी मिळाल्यानंतर विषय पत्रिकेवरील इतर विषयांना प्रारंभ झाला. यामध्ये नगर परिषदेच्या मालकीची नवीन भाजी मार्केटची धोकादायक इमारत पाडून तेथे नवी इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर रत्नागिरी शहर विकास योजनेंतर्गत माळनाका येथील नगर परिषद दवाखाना व व्यायामशाळा आरक्षणामध्ये व्यापारी संकुल कार्यालये, दवाखाना व व्यायामशाळा वापर करण्यासाठी जो प्रस्ताव बनवण्यात आला आहे तो शासनाच्या मंजूरीसाठी पाठवण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.