रत्नागिरी:- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे बुधवारी (ता. ३१) सर्व भक्तांना श्री गणेश चतुर्थी निमित्त साध्या वेशात पहाटे ४.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत स्पर्श दर्शन करण्यास मिळणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे हा योग आलेला नव्हता.
प्रति वर्षाप्रमाणे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीं च्या मंदिरात सर्व भक्तांना साध्या देशात थेट गाभार्यात स्पर्श दर्शन मिळते. वर्षातून हे दर्शन फक्त एकाच दिवशी मिळत असल्याने गणपतीपुळेसह परिसरातील ग्रामस्थ या स्पर्शदर्शनाचा लाभ घेतात; परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना कालावधीत मंदिर बंद असल्यामुळे तसेच शासनाचे निर्बंध लागू राहिल्याने सदरचे स्पर्शदर्शन ग्रामस्थांना घेता आले नाही. सध्या कोरोनाचे निर्बंध उठवण्यात आले असून स्पर्श दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. बुधवार स्वयंभू गणेश मंदिर पहाटे तीन वाजता उघडण्यात येणार आहे. श्रीं ची पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती होऊन सर्व भाविकांना स्पर्श दर्शनासाठी मंदिर पहाटे ४.३० वाजता खुले केले जाईल.
गणपतीपुळेत एक गाव- एक गणपती ची प्रथा पारंपारिकरित्या यंदाही जोपासणार असून केवळ गौरीउत्सव मोठ्या धुमधडाक्यात घरोघरी साजरा होणार आहे. विशेष म्हणजे गणपतीपुळे मंदिरातील ’गणपती’ हाच आपला घरचा गणपती असल्याची सुमारे पाचशे वर्षांपूर्वींची प्रथा असल्याने गणपती मंदिरात सर्व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार्या स्पर्श दर्शनासाठी खर्या अर्थाने स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने येत असतात. या कारणाने आलेल्या स्थानिक ग्रामस्थांनासह विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांनाही ठराविक दिलेल्या वेळेत दर्शन घेण्याची सोय अतिशय सुलभतेने होण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण स्थानिक ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.