एकेकाळचे जिवलग मित्र ३ वेगवेगळ्या पक्षांचे तालुकाध्यक्ष

चिपळूण:- तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्राबल्य असलेल्या शहरालगतच्या खेर्डी येथील ३ पदाधिकारी मोठ्या राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून प्रतिनीधीत्व करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांचे तालुकाध्यक्ष खेर्डीचे रहिवासी. विशेष म्हणजे एकेकाळचे चांगले मित्र असलेले हे तिन्ही तालुकाध्यक्ष काही वर्षापुर्वी एकाच संघटनेत, पक्षात कार्यरत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते यांच्या मुशित तयार झालेले हे तिन्ही तालुकाध्यक्ष आगामी काळात एकमेकाविरोधात राजकीय संघर्षात भिडणार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी खेर्डी ग्रामपंचायतीवर गेली २० वर्षे वर्चस्व ठेवले आहे. खताते हे पुण्यातून गावी खेर्डीत १९९० च्या सुमारास आल्यानंतर १९९५ ला ग्रामपंचायतीच्या राजकारणात प्रवेश केला. अल्प कालावधीत त्यांनी राजकारणाची घडी बसवली. त्यांनी सरपंच म्हणूनही सव्वा वर्षे काम केले. २००५ च्या सुमारास ग्रामपंचायतीत खताते यांच्या पॅनेलची सत्ता आल्यानंतर ती आजपर्यत कायम राहिली आहे. सुरवातीच्या कालावधीत प्रशांत यादव, दशरथ दाभोळकर, नितीन ठसाळे, यांना सरपंच पदाची संधी मिळाली. सरपंचपदासाठी सव्वा वर्षाच्या पॅटर्न ठरवल्याने अनेकदांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. सध्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश साळवी आणि भाजप तालुकाध्यक्ष विनोद भूरण हेही गेल्या काही वर्षात जयंद्रथ खताते यांच्या सोबत संघटनेत कार्यरत होते. माजी सरपंच प्रशांव राष्टवादीतून बाहेर पडल्यानतर ते कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष झाले. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांनी चिपळूण विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र थोड्याशा मतांनी त्यांचा पराभव झाला. आता भाजपमध्येच त्यांनी आपल्या कार्याचा आलेख उंचावत ठेवला आहे. एकूणच गेल्या २० वर्षात यादव यांनी राजकीय कक्षा रूंदावत ठेवल्या. खताते यांनी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जबाबदारी नितीन ठसाळे यांच्यावर सोपवण्यात आली. ठसाळे यांनी सरपंचपदानंतर पंचायत समिती सदस्य म्हणूनही विजयी झाले होते. आता ते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भाजप तालुकाध्यक्ष विनोद भूरण हे देखील एकेकाळी खताते यांच्याच संघटनेतले. त्यांनीही ग्रामपंचायतीत उपसरपंच म्हणून कामकाज करताना व्यवसाय आणि राजकारणात कक्षा वाढवल्या आहेत. लियाकत शाह यांची कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर तेथे खेर्डीतील प्रकाश साळवी यांची वर्णी लागली. साळवी यांनीही खेर्डी ग्रामपंचायतीत उपसरपंच म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी जिल्ह्यात कुंभार समाजाला संगठीत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. साळवी तालुकाध्यक्ष झाल्यानंतर योगायोगाने तिन मोठ्या राजकीय पक्षांचे तालुकाध्यक्ष एकाच गावाला मिळाले आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत एकेकाळचे चांगले मित्र असलेले तिन्ही तालुकाध्यक्ष राजकीय संघर्षात भिडणार आहेत. यात कोणाची सरशी होते, तो काळच ठरवणार आहे.