रत्नागिरी:- जिल्ह्यातील वीजग्राहकांचा ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे कल वाढला आहे. रांगेत उभं राहायला नको की बॅंक किंवा पतसंस्थेत बिल भरायची झंजट नको. थेट क्युआर कोड स्कॅन करून सोप्या पद्धतीने बिलं भरली जात आहेत. जिल्ह्यात जून महिन्यात २ लाख १० हजार ग्राहकांनी ७१ कोटी १४ लाखाची वीजबिले ऑनलाईन भरली आहेत तर २९ कोटी रुपये ऑफलाईन भरण्यात आले आहेत.
डिजिटल इंडियाच्या माध्यमतून गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन व्यवहार सुरू झाले आहेत. लोकांना आता ही सुविधा अगदी सोपी आणि विनात्रास असल्याने त्याकडे वाढता कल आहे. महावितरण कंपनीच्या वीजबिल देयकावरून ते आता अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात 2 लाख ग्राहकांनी ५८ कोटी ३७ लाख वीजदेयक रक्कम ऑनलाईन भरली. मे महिन्यात 2 लाख 33 हजार ग्राहकांनी ७४ कोटी ३३ लाख वीज देयक रक्कम ऑनलाईन भरली. जून महिन्यात 2 लाख १० हजार ग्राहकांनी ७१ कोटी १४ लाख वीज देयक रक्कम ऑनलाईन भरली आहे. दिवसेंदिवस वीजग्राहकांचा ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे जास्त कल वाढला आहे तर ऑफलाईन वीजबिल भरण्याकडे कल कमी होताना दिसत आहे. एप्रिल 2023 या महिन्यात १ लाख ९२ हजार ग्राहकांनी १५ कोटी ६९ लाख वीजदेयक रक्कम ऑफलाईन भरली. मे महिन्यात 2 लाख ४६ हजार ग्राहकांनी २६ कोटी ७३ लाख वीज देयक रक्कम ऑफलाईन भरली आहे. जून महिन्यात 2 लाख २७ हजार ग्राहकांनी २९ कोटी रुपये वीज देयक रक्कम ऑफलाईन भरली आहे. यावरून ऑफलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल कमी होताना दिसत आहे.