एका आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाने 49 मृत्यू

रत्नागिरी:- मागील आठवड्यात जिल्ह्यात १ हजार २०२ कोरोना बाधित सापडले आहेत. जुन, जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात बाधित सापडण्याचे प्रमाणे कमी होऊ लागले आहे; मात्र मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात अजुनही प्रशासनाला यश आलेले नाही. आठवडा भरात ४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बाधित उपचारासाठी उशिराने येत असल्याने प्रशासनाला मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येत आहेत.

मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यानंतर पुढील पाच महिने उत्तरोत्तर कोरोनाचे बाधित होते. दिवसाला पाचशेच्या वर बाधित सापडत होते. शहरांपेक्षा गावांमध्ये बाधितांची संख्या अधिक होती. जुनच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाने आठ दिवसांची कडक टाळेबंदी केली. तरीही नियंत्रण आले नव्हते. वाडी, वस्तीवर जाऊन कोरोना चाचण्या सुरु झाल्या. एकाच गावात किंवा वाडीत अधिक बाधित असतील तर तो भाग उद्रेकजन्य म्हणून जाहीर करत निर्बध कडक केले. त्याचे परिणाम जुलैच्या अखेरीस दिसू लागले. महापुराची स्थिती असतानाही चाचण्यांची संख्या चार ते पाच हजाराच्या दरम्यान राहीली. गेल्या आठवड्यात बाधितांची संख्या दीडशे ते सव्वादोनशेच्या मध्येच होती. एकच दिवस पावणेतीनशे बाधित सापडले होते. आरोग्य विभागाने आरटीपीसीआरची संख्या वाढवली आहे. तसेच एका बाधितामागे तेरा जणांचा शोध घेण्यावर भर दिला आहे. येत्या महिन्याभरात त्याचा परिणाम दिसेल असा विश्‍वास आरोग्य विभागाकडून व्यक्त केला जात आहे. मागील तिन महिन्यात प्रत्येक आठवड्याला दोन ते तिन हजार बाधित सापडत होते. ते प्रमाण पन्नास टक्के खाली आले आहे. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत १ हजार २०२ बाधित सापडले. तसेच बरे होण्याचा टक्काही ९३.८५ वरुन ९४.२४ टक्केवर आला आहे. १ हजार ४११ जणं बरे झाले. मात्र मृतांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन यशस्वी झालेले नाही. अजुनही अनेक बाधित उशिराने उपचारासाठी येतात. यासाठी आरोग्य विभागाकडूनही प्रयत्न सुरु आहेत. सध्या जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट साडेतीन टक्केच्या दरम्यान आहे.