राजापूर:- रिफायनरी विरोधात सोलगाव बारसु परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आज बुधवारी रस्त्यावर उतरले. राजापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. राजापूर येथील जवाहर चौकातील खर्ली नदीपात्रातून मोर्चाला सुरूवात झाली आहे.
एकच जिद्द .. रिफायनरी रद्द यासह शिवसेनेचे मंत्री, आमदार यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत आज बुधवारी रिफायनरी विरोधकांनी राजापूर तहसील कार्यालयावर केंद्र शासनाच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात मोर्चा काढून आपला विरोध दर्शवला. तर, धोपेश्वर बारसु परिसरात शिवसेनाच या प्रकल्पासाठी आग्रही असल्यामुळे या मोर्चात शिवसेनाविरोधी घोषणाच अधिक देण्यात आल्या.
दरम्यान, आजच रिफायनरी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांमध्ये शिवसेनेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.
केंद्र सरकारच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला या अगोदर नाणार परिसरात विरोध करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शिवसेनेने धोपेश्वर बारसु परिसरात मिनी औद्योगिक वसाहतीसाठी अधिसुचना जाहीर केली होती. त्यानंतर या परिसरात रिफायनरी प्रकल्प हलवण्याची तयारी सुरु केली. . पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी रिफायनरी होण्याचे संकेत दिले. गेले दोन दिवस कोकण दौऱ्यावर असणारे आदित्य ठाकरे यानी मंगळवारी पुन्हा राजापूर येथे या प्रकल्पाचे सुतोवाच केले. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधाचा सूर आळवण्यात आला आहे.









