उष्म्याच्या तुलनेत रत्नागिरी शहराला पाणीटंचाईच्या झळा कमी

रत्नागिरी:- अलनिनोच्या प्रभावामुळे कमी झालेल्या पर्जन्यमानाने यंदा लवकर पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यात अंगाची लाही करणाऱ्या उष्म्यामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. या परिस्थितीचा विचार करून रत्नागिरी पालिकने १५ जूनपर्यंत शहरवासियांना पाणी पुरावे यासाठी पावसाळ्या ३ महिने आधीच पाण्याचे नियोजन केले. सुरवातीला आठवड्यातून एकदा त्यानंतर आठवड्यातून २ दिवस पाणी बंद आणि एप्रिल पहिल्या पंधरवड्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. पालिकेच्या नियोजनामुळे शहर पाणीटंचाईपासून सध्या बचावले आहे.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे तीन जलस्रोत आहेत. शीळ, पानवल धरण आणि नाचणे येथील तलावामधून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी पानवल धरणाला गळती असल्याने ते बंद ठेवण्यात आले आहे. नाचणेतील तलाव आटल्यामुळे एका शीळ धरणावर शहराची भिस्त आहे. गेल्या वर्षी या महिन्यात शहराला मुबलक पाणीपुरवठा सुरू होता. एप्रिल महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा अलनिनोमुळे परतीचा पाऊसच झाला नाही. हा पाऊस झाला तर शीळ धरण २० ते २५ दिवस भरून वाहते. त्यामुळे तेवढे दिवस पुढे उन्हाळ्यात शहराला चांगला पाणीपुरवठा होतो. शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.७७६ दशलक्ष घनमीटर आहे; परंतु या वेळी पाऊस कमी झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच धरणातील पाणीसाठा मर्यादित झाला. सध्या या धरणामध्ये १.३३८ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. हे पाणी पुढे १५ जूनपर्यंत पुरवण्यासाठी मोठी कसरत पालिका प्रशासनाला करावी लागणार होती. शहरात साडेअकरा हजार नळधारक असून, त्यांना दिवसाला २० एमएलडी पाणीपुरवठा करावा लागतो.

मुख्याधिकारी तुषार बाबर, पाणी अभियंता अविनाश भोईर यांनी सर्व कर्मचाऱ्यांशी विचारविनिमय करून ३ महिने आधीच शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू केले. फेब्रुवारी महिन्यात दर सोमवारी पाणीपुरवठा बंद करून पाणीकपात करण्यात आली; परंतु उष्मा वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊन साठ्यावर परिणाम होऊ लागला. त्यामुळे पालिकेने उपलब्ध साठा १५ जूनपर्यंत पोहचण्यासाठी आठवड्यातून दोनवेळा म्हणजे सोमवार आणि गुरूवारी पाणीकपात सुरू केली. पुन्हा पाणीसाठा मोजून दिवसाआड पाणीपुरवठ्याबाबत पालिकेला निर्णय घ्यावा लागणार आहे.

शीळ धरण भाडेतत्त्वावर घेतले

साडेसहा किमी लांब असलेल्या शीळ धरणावरून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा केला जातो. शीळ नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाचे हे धरण असले तरी रत्नागिरी पालिकेने भाडेतत्त्वावर ते घेतले आहे. महिन्याला सुमारे साडेपाच लाखाचा पाण्याचा कर पालिका पाटबंधारे विभागाला भरते. विशेष म्हणजे या पाण्यावर १०० टक्के अधिकार पालिकेचा आहे. ते अन्य दुसऱ्या कोणत्याही वापरासाठी आरक्षित नाही.