उल्लेख नसल्याने अनेक दिव्यांग निवडणूक कामात

कामातून वगळण्याची मागणी; अपंग संघटनेची निवडणूक विभागाकडे धाव

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ३५० हून अधिक दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्यासाठी दिव्यांग समन्वय समिती आणि दिव्यांग कर्मचारी संघटनेने विनंती केली आहे; मात्र अनेक विभागातून आपला कर्मचारी दिव्यांग असल्याचेच न कळवल्याने अनेक दिव्यांगांना निवडणूक कामात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगांना निवडणूक कामातून वगळावे, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिले आहे.

निवडणूक कामात सामावून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी याची माहिती मागवली होती. त्यावरूनच अनेकांना निवडणुकीच्या विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३५०हून अधिक अपंग कर्मचाऱ्यांनाही या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळेच महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेने काल जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदन दिले. काही दिव्यांग कर्मचारी निवृत्त होण्यास काही महिने राहिले असतानाही त्यांना निवडणूक कामी काढण्यात आले आहे. निवडणुकीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या याद्या प्रत्येक विभागाकडून मागवण्यात आल्या होत्या; मात्र अनेक विभागांनी विशेषतः शिक्षण विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांची यादी देताना दिव्यांग कर्मचारी म्हणून उल्लेख करणे गरजेचे होते; मात्र असा उल्लेख नसल्याने सरसकट सगळ्यांना निवडणूक कामी काढण्यात आले. याचा त्रास आता ४० टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या तसेच काही महिन्यातच निवृत्त होणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना होत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार अपंग कर्मचारी, स्तनदा माता, गरोदर स्त्रिया तसेच दुर्धर आजार असलेले कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी घेणे योग्य नाही. या संदर्भात उच्च न्यायालयात झालेल्या निर्णयानुसार, हा नियम संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आला आहे; मात्र असे असतानाही जिल्ह्यातील अनेक अपंग कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणूकीच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने नाराजीचा सूर असून, या कामातून वगळण्याबाबत संघटनेची मागणी आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामी काढू नये अशा सूचना आहेत; मात्र तरीही जिल्हा प्रशासनाने दिव्यांगांना कामासाठी काढले असून, किमान निवृत्तीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना आणि ८० टक्के दिव्यंगत्व असणाऱ्यांना या कामातून वगळावे.आनंद त्रिपाठी, अध्यक्ष, दिव्यांग समन्वय समिती, रत्नागिरी


दिव्यांग मतदारांसाठी जिल्ह्यातील जे बूथ निश्चित करण्यात आले आहेत अशाच बूथवर दिव्यांग कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे तसेच निवडणूक कामातून त्यांना वगळण्यात आले आहे.

  • -चंद्रकांत सूर्यवंशी, निवासी जिल्हाधिकारी, रत्नागिरी